कोरोना हॉटस्पॉटमध्ये ग्रामस्थ-प्रशासन भिडले; रेवस-बोडणी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:47 PM2020-07-22T23:47:44+5:302020-07-22T23:47:58+5:30
पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत
रायगड : अलिबाग तालुक्यातील रेवस-बोडणी गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. येथील ग्रामस्थ आणि अलिबागचे तहसीलदार यांच्यामध्ये बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जोरदार शाब्दिक धूमश्चक्री उडाली. काही ग्रामस्थ प्रशासनाच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
रेवस बोडणी गावामध्ये सुमारे ७२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. गावातील नागरिक कोरोना उपचारासाठी सहकार्य करत नसल्याने, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आरोग्य पथकासह बुधवारी दुपारी १ वाजता गावात भेट दिली. आरोग्य विभागासह प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार शेजाळ यांनी ग्रामस्थांना केले. त्यावेळी ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले. गावातून निघून जा, असाच पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी दोन्हीकडून जोरदार शाब्दिक धूमश्चक्री उडाली. याप्रसंगी सामाजिक अंतर पाळण्याचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. अलिबाग तालुक्यामध्ये आतापर्यंत ७३९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी २१ जुलैपर्यंतची आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस-बोडणी परिसरामध्ये ७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आरोग्य पथकाने त्या ठिकाणी घरात जाऊन स्क्रीनिंग सुरू केले, तसेच त्यांच्यामार्फत औषधांचे वाटपही करण्यात येत होते.
कोरोना रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब टेस्ट घेण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, गावातील सुमारे चार व्यक्तींनी कोरोनाची स्वॅब टेस्ट देण्यास नकार दिला, तर ४३ नागरिकांनी औषधोपचार घेण्यासही आरोग्य पथकाला रोखले होते. त्याचप्रमाणे, होम आयसोलेशनमधील कोरोनाचे रुग्ण कोणत्याच नियमांचे पालन करत नव्हते.
नागरिकांनी असेच असहकार्याचे धोरण ठेवल्यास गावामध्ये कोरोनाचा अधिक फैलाव होण्याची शक्यता गृहित धरून, पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कोप्रोली उपकेंद्र बोडणीतील आरोग्यसेवकांनी याबाबतचा अहवाल तयार केला. अलिबागच्या तहसीलदारांना २१ जुलै रोजी अहवाल देऊन तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली. त्यानुसार, अलिबागचे तहसीलदार बुधवारी तेथे पोचले होते. ग्रामस्थ प्रशासानाचे म्हणणे ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याने वातावरण चिघळले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणायचा असेल, तर प्रथम ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे.
आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही
च्ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील एका नागरिकाला काही दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याने अलिबागच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी उपचार न करता, सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, अलिबागच्या सरकारी रुग्णालयात संबंधित रुग्णाला दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. च्कोरोनाच्या संशयावरून यंत्रणेने संबंधिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नातेवाइकांना याबाबत अंधारात ठेवले. कोरोना झाल्याचे स्पष्ट झालेले नसताना पार्थिव नातेवाइकांना का दिले नाही, अशी खदखद त्यांच्यामध्ये होती, अशी चर्चा होती.
च्सरकारी आरोग्य यंत्रणेवर आमचा विश्वास नाही. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे स्वॅब टेस्ट घेतल्यावर त्यातील काहीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते आणि काहींचे नेगेटिव्ह. त्यानंतर चार दिवसांनी ज्यांचे निगेटिव्ह अहवाल आले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. त्यामुळे आमचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही, अशीही चर्चा गावात आहे.
रेवस-बोडणी गावातील ग्रामस्थ आरोग्य यंत्रणेला सहकार्य करत नाहीत, तसेच कोरोनासंबंधी नियमांचेही पालन करत नाहीत. या पार्श्वभूमीवर गावात गेलो होतो. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. काही ग्रामस्थ अंगावर धावून आले. कायदे न पाळणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावात काही दिवसांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होता. आसीएमआरच्या निर्देशानुसार पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- सचिन शेजाळ,
, अलिबाग