गावठी शेंगा वधारल्या, बाजारात जोरदार विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:45 AM2021-02-09T01:45:56+5:302021-02-09T01:46:12+5:30
वाल, मूग, चवळीला मागणी
- गिरीश गोरेगावकर
माणगाव : लांबलेला व अवकाळी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील विविध कडधान्य तयार होण्यास उशीर झाला आहे. वाल, चवळी, मुगाच्या
शेंगांना तालुक्यात चांगली मागणी असून, पंधरा ते वीस दिवस उशिराने बाजारात दाखल झालेल्या वाल, मूग, चवळी इत्यादी शेंगाची विक्री बाजारात जोरदारपणे होत आहे.
तालुक्यात रब्बी हंगामात वाल, मूग, चवळी इत्यादी कडधान्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, गेले दोन ते चार दिवसांत तालुक्यातील विविध शहरांतून तयार झालेल्या शेंगा विक्रीसाठी येत असून, यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अत्यंत चवदार असलेल्या या शेंगा शिजवून व भाजून पोपटी लावून खाण्यासाठी अनेक ग्राहक खरेदी करतात.
वालाच्या शेंगांना विशेष मागणी असून, गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या वालाच्या शेंगा या वर्षी महाग झाल्या असून, १०० ते १२० रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत.
पोपटीसाठी वालाच्या शेंगांना मागणी आहे
वाल तयार झाला नसल्याने अनेक पोपटीप्रिय ग्राहक घाटमाथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी उपयोगात आणत होते. बाजारात गावठी वालाच्या शेंगा उपलब्ध झाल्याने, खवय्यांनी गावठी शेंगांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे.
या वर्षी वाल, मूग, चवळीच्या शेंगा तयार होण्यास उशीर झाला. आता मात्र, शेंगा तयार झाल्या असून, अजून चार ते पाच दिवसांनी मोठ्या प्रमाणात मिळतील. या वर्षी पाऊस लांबल्याने कडधान्य शेंगा तयार होण्यास उशीर झाला.
- सीता काटकर, शेंगा विक्रेता
गावठी वालाच्या शेंगा अतिशय चवदार असतात. या वर्षी अवकाळीने या शेंगा उशिराने विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, पोपटीसाठी व शिजवून खाण्यासाठी या शेंगा अतिशय चवदार आहेत. त्यामुळे यांना मोठी मागणी आहे.
- सुमित मोंडे, मुंबईकर चाकरमानी
शेंगांचे बाजारातील दर
शेंगा मागील वर्षी यावर्षी
वाल ८० ते १०० १०० ते १२०
मूग ५० ते ६० ७० ते ८०
चवळी ४० ते ५० ६० ते ८०
(दर रुपयांमध्ये)