- विशेष प्रतिनिधीअलिबाग : बुधवारी रात्री आलेल्या सागरी उधाणाच्या भरतीने अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर गावांच्या पूर्वेकडील समुद्र भरती संरक्षक बंधा-यांना एकूण १५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडली. यामुळे समुद्राचे खारे पाणी या दोन्ही गावांच्या हद्दीतील तब्बल एक हजार एकर भातशेती क्षेत्रात घुसून नुकसान झाल्याचे गुरुवारी दिसून आल्यावर शुक्रवारी आलेल्या उधाणाचे पाणी थेट गावांतील मानवी वस्तीत पोहोचले. अभय पाटील आणि त्यांच्या शेजारील घरांभोवती हे उधाणाचे पाणी भरून राहिले होते.बुधवारी बंधारे फुटून ज्या शेतकºयांच्या शेतजमिनीत खारे पाणी घुसले आहे, त्या शेतकºयांच्या नुकसानीचे आणि उधाणाच्या परिस्थितीचे पंचनामे करण्याचे काम शहापूर व धेरंड गाव परिसरात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानी संदर्भातील अहवाल शासनास पाठविण्यात येईल, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.धेरंडखाडी किनारी असणारा व फुटलेला संरक्षक बंधारा हा शासकीय मालकीचा आहे, तर मोठा पाडा येथील फुटलेला बंधारा खासगी मालकीचा असून, तो एमआयडीसीच्या ताब्यात आहे. परिणामी, शासकीय मालकीच्या बंधाºयांची दुरुस्ती शासनस्तरावरून तत्काळ होणे जसे गरजेचे आहे, तसेच एमआयडीसीच्या ताब्यातील खासगी संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती एमआयडीसीने तातडीने करणे क्रमप्राप्त असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.खासगी संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम रोजगार हमी योजनेतून करणे शक्य आहे. त्याकरिता शेतकरीदेखील तयार आहेत; परंतु शासनाने गेल्या सात ते आठ वर्षांत याबाबत निर्णयच घेतलेला नसल्याचे भगत यांनी सांगितले.नवीन पनवेलमधील खांदा वसाहतीतील महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी १ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली संयुक्त बैठक रद्द केली. या बैठकीच्या रद्दतेच्या कारणाचा शोध घेण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा शोध घेण्याच्या कामाची जबाबदारी शहापूर-धेरंडमधील मधुरा पाटील, तेजश्री पाटील आणि नलू पाटील या तीन महिला शेतकºयांनी स्वीकारली असल्याचे भगत यांनी सांगितले.खातरजमा करणारशहापूर-धेरंडमधील शेतकºयांच्या जीवन मराणाच्या अत्यंत गंभीर प्रश्नासंदर्भात असणारी बैठक रद्द करून आपण कोणत्या शासकीय बैठकीकरिता कोठे गेला होता? याची माहिती देऊन त्या बैठकीचा शासकीय कार्यवृत्तान्त आम्हास द्यावा, अशी लेखी मागणी करणारे निवेदन तीन शेतकरी महिला शनिवारी प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना देणार आहेत.ते ज्या ठिकाणी बैठकीस गेले होते ते सांगतील त्या कार्यालयात वा त्या ठिकाणी जाऊन पुढील खातरजमाही करण्याचा निर्णय या महिला शेतकºयांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २८ एप्रिल २०११ रोजी तत्कालीन आयुक्त एस. एस. संधू यांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकीस वनविभागाचे अधिकारी गैरहजर राहिले होते.त्या वेळी वनविभागाच्या त्या अधिकाºयांना ते नेमके कु ठे होते, बैठकीस गैरहजर का होते, या बाबत लेखी पत्र दिले होते. त्याचे उत्तर त्यांनी आजतागायत दिलेले नाही. हा वाईट अनुभव विचारात घेऊन या वेळी गैरहजेरी आणि रद्दतेच्या कारणांची पूर्ण खातरजमा करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
उधाणाचे पाणी पोहोचले धेरंड-शहापूर गावांत, नुकसानी पंचनाम्यांचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:58 AM