जिल्ह्यात गावागावात स्वच्छता अभियान संपन्न
By निखिल म्हात्रे | Published: October 1, 2023 04:31 PM2023-10-01T16:31:47+5:302023-10-01T16:32:04+5:30
लाखो हातांनी मिळून जिल्हा स्वच्छ केला.
अलिबाग - रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. श्रमदान मोहिमेअंतर्गत गावागावात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते. लाखो हातांनी मिळून जिल्हा स्वच्छ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे दृश्य परिणाम आज पहावयास मिळाले. प्रत्येक गावागावात उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियान अंतर्गत सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्रार्थनास्थळे, बाजार, बस स्थानक, समुद्रकिनारे, नदी किनारी, तलाव परिसर यासह इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा करण्यात आलेला कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंड ठिकाणी नेण्यात आला. तसेच सर्वत्र नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
जिल्ह्यात आज सर्वत्र श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान ही एक चळवळ म्हणून सर्वांनी कायम ठेवली पाहिजे. सर्वांनी मिळून पृथ्वी, जल, वायू स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबत सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. : डॉ. भरत बास्टेवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.