वाढत्या पुराच्या पाण्याने दासगावच्या ग्रामस्थांनी सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:02 AM2019-08-08T00:02:57+5:302019-08-08T00:03:38+5:30
२६ जुलै २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्याने दासगाव परिसरात हाहाकार उडाला.
दासगाव : मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून महाडमध्ये पुन्हा जोरदार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. बघता बघता पाण्याने जोर धरला. पूर्ण महाड तालुक्याला हादरून काढले. संपूर्ण दासगाव परिसर जलमय झाला. २६ जुलै २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्याने दासगाव परिसरात हाहाकार उडाला. राष्ट्रीय महामार्गावर पाणी भरल्याने एक ट्रक पाण्यामध्ये वाहता वाहता वाचला.
मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून पावसाने जोर धरत महाड तालुक्यातील संपूर्ण खेड्यापाड्यांना झोडपून काढले. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजल्यापासून अचानक पुराच्या पाण्याने जोर धरला. बघता बघता संपूर्ण तालुक्याला वेढा घातला.
अचानक वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे दासगाव बंदर रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्गच बंद पडला. त्यामुळे बंदर विभागातील नागरिकांची रहदारी बंद पडली. अनेक घरांमध्ये अचानक पाणी शिरल्याने सर्व दासगावकरांना २६ जुलै २००५ च्या पुराच्या पाण्याची आठवण करून दिली. त्यामुळे बंदर विभागातील अनेक नागरिकांनी घरदार सोडून मुलाबाळांसह या विभागातून पळ काढला.
संध्याकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी चढत घरादारात, दुकानात शिरत गेल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पाण्याशेजारी असलेल्या दुकानदारांनी आणि घरमालकांनी आपले आतील सामान व्यवस्थित, सुरक्षित ठेवत रात्र या पाण्याच्या भीतीने जागून काढली. या पुराच्या पाण्यामुळे कोणती मोठी हानी झाली नसली तरी संपूर्ण दासगावमध्ये रात्रभर घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासूनच वीज गायब झाल्याने धावपळ झाली.