कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:51 AM2021-01-25T00:51:10+5:302021-01-25T00:51:17+5:30
एक महिन्याच्या आत काम सुरू करण्याचे नगराध्याक्ष्यांचे आश्वासन; उपोषण स्थगित
कर्जत : चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाल्यामुळे भिसेगावमधील ग्रामस्थांनी २४ जानेवारीला उपोषण सुरू केले होते; मात्र हा रस्ता कर्जत नगरपरिषद हद्दीत असल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी रविवारी दुपारी उपोषण स्थगित केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाल्यामुळे भिसेगावमधील ग्रामस्थ रमेश किसन हजारे, दिनेश लक्ष्मण भरकले आणि अजित पांडुरंग राऊत यांनी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता भिसेगाव येथे उपोषण सुरू केले होते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत आहे; मात्र रस्ता तांत्रिक अडचणीमुळे होत नसल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यहार करून रस्ते विकास योजनेअंतर्गत कर्जत नगरपरिषद हद्दीतील मंजूर झालेल्या कामाचे नाव श्रद्धा हॉटेल ते भिसेगाव चौक, भिसेगाव ते कर्जत चार पदरी पर्यंतचे रस्ता तयार करण्याऐवजी श्रद्धा हॉटेल ते चार पदरी रस्ता म्हणजे चार फाटा बदलून मिळण्याबाबत ५ ऑगस्ट २०२० रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्स्त्याचे काम अद्याप सुरू केले नाही, या खराब रस्त्यावरून वाहन चालविणे वाहन चालक याला जिकिरीचे झाले होते. म्हणून भिसेगावमधील ग्रामस्थ यांनी उपोषणचा मार्ग अवलंबला तसा पत्रव्यवहार सार्वजनिक विभाग कार्यालय यांच्याशी केला.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ जानेवारीला उपोषणकर्ते यांच्याशी पत्रव्यवहार करून कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल हा रस्ता नगरपरिषद कर्जत त्यांच्या हद्दीत येत असल्यामुळे कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल हा रस्ता कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्याबाबत नगरपरिषद यांच्यामार्फत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने प्रस्ताव अर्ज करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे एमएमआरडीए मुंबई यांच्यामार्फत कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी इतका निधी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून, या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीत आहेत असे सांगण्यात आले. तरी आपण याबाबत नगरपरिषद यांच्याशी संपर्क साधावा व २३ जानेवारीला आयोजित केलेले उपोषण करू नये अशी विनंती उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी उपोषणकर्त्यांना पत्राच्या मार्फत केली होती.
उपोषणकर्ते याचं या पत्रावर समाधान झाले नाही. अखेर २३ जानेवारीला उपोषण सुरू केले. यावेळी दुपारी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली, यावेळी त्यांचासमवेत उपनराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, कर्जत नगररचना सहायक लक्ष्मण माने, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता कुणाल गोसावी उपस्थित होते. यावेळी भाजपचे नेते रमेश मुंढे, दीपक बेहेरे, सरस्वती चौधरी, ग्रामस्थ सुरेश भरकले, राकेश देशमुख, जगदीश दिसले, प्रभाकर हजारे, पंढरीनाथ लबडे, मोहन भोईर, पोलीसपाटील संजय हजारे, आदी उपस्थित होते.
अद्यापपर्यंत हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग झाला नाही; मात्र याबाबाबत मी त्याचा पाठपुरावा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक महिन्याच्या आत या रस्त्याचे काम सुरू करेन, असा शब्द उपोषणकर्त्यांना दिला. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिलेल्या शब्दाचा मान ठेवून उपोषणकर्त्यांनी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते उसाचा रस पिऊन उपोषण स्थगित केले.