मोहोपाडा : लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोरोना विषाणू संक्रमण केंद्राबाबत सोशल मीडियावरील अफवांमुळे परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. सोमवारी रात्री हॉस्पिटलसमोर परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले होते.जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना या संसर्गजन्य रोगाला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांचा शोध पोलीस, महसूल विभाग व आरोग्य विभाग घेत आहे. खालापूर तालुक्यातील इंडिया बुल्स दहा रूम, पाली फाटा, धीरूभाई अंबानी हॉस्पिटल दहा रूम लोधीवली, सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालय तीन, रायगड जिल्हा परिषद खालापूर विश्रामगृह दोन, पर्ल्स हॉस्पिटल मोहपाडा, मोहिते हॉस्पिटल खोपोली, संपूर्ण रेगे हॉस्पिटल चांभार्ली येथे कोरोना विषाणू संक्रमण उपाययोजना केंद्रे निर्माण केली आहेत. लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये बाहेरचे रुग्ण आणले जाणार, अशी सोशल मीडियावर अफवा पसरली. त्यामुळे स्थानिक हॉस्पिटल परिसरात जमू लागले, सोमवारी रात्री उशिरा मंडळ निरीक्षक नितीन परदेशी यांनी बाहेरचे रुग्ण आणले जाणार नाहीत, असे नागरिकांना लिहून दिल्यावर लोक घरी जाऊन पुन्हा मंगळवारी सकाळपासूनच दुपारपर्यंत जमा होऊन तहसीलदार खालापूर यांची वाट पाहू लागले. दैनंदिन कामात व्यस्त असल्याने त्यांना उशीर झाला, त्यामुळे काही ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात जाऊन भेट घेतली. बाहेरून रुग्ण येणार नसल्याचे ठोस आश्वासन तहसीलदारांनी दिल्यावर ग्रामस्थ निघून गेले. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मंडळ अधिकारी नितीन परदेशी यांनी आवाहन केले आहे.कोरोनटाइन सेंटर चार ठिकाणी असून पर्ल्स हॉस्पिटल मोहपाडा, मोहिते हॉस्पिटल खोपोली व रेघे हॉस्पिटल मोहपाडा येथे प्रत्येकी एका रूममध्ये आयसोलेशन सेंटर, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध केली आहे. रुग्णांना पिण्याचे पाणी, शौचालय, टीव्ही, जेवण व लाइटची सोय करण्यात आली आहे.- इरेश चप्पलवार, तहसीलदार
लोधीवली येथील कोरोना विषाणू संक्रमण केंद्राला ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 1:52 AM