पेठ गावचे ग्रामस्थ विहीर खोदण्यासाठी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:31 AM2019-04-21T00:31:32+5:302019-04-21T00:31:36+5:30
पाणीटंचाईची झळ; टेंभरे ग्रामपंचायतीची उदासीनता
कर्जत : तालुक्यात ऐतिहासिक पेठचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ गाव वसलेले असून टेंभरे ग्रामपंचायत हद्दीत येते. अशा या गावात आता पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. याला टेंभरे ग्रामपंचायतीची उदासीनताच कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र, या ग्रामस्थांनी नुसते आरोप करत न बसता एकत्रित येऊन साथी हाथ बढाना... असे म्हणत रणरणत्या उन्हात श्रमदानातून विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या विहिरीला पाणी लागून या गावकऱ्यांची तहान भागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.
आपल्या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. पाणी कुठे मिळते का यासाठी अनेक गावात हंडा कळशी घेऊन भटकावे लागते. यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे. आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते मंडळींनी लक्ष देणे गरजेचे होते. ऐतिहासिक पेठचा किल्ल्याचा विचार करून आतापर्यंत पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे होती; पण याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत, सरपंच, लोकप्रतिनिधी मग मते मागायला येतात कशाला, असा उपरोधिक सवाल ग्रामस्थ करीत आहेत. टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील पेठ गावाची लोकसंख्या सुमारे ३०० च्या आसपास आहे. पाण्याची वाढती समस्या लक्षात घेऊन अखेर नाईलाजाने ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन पाण्याची सोय करण्यासाठी गावात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले आहे.