जॅकवेलमधून ग्रामस्थांनी काढला गाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:58 PM2019-10-21T23:58:05+5:302019-10-21T23:58:43+5:30
फिल्टर पाणी कधी मिळणार; संतप्त पालीकरांचा सवाल
पाली : गेल्या १५ दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाणी प्यावे लागत होते; परंतु सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे ग्रामपंचाय सदस्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी फिल्टर झालेले शुद्ध पाणी कधी मिळणार, असा सवाल संतप्त पालीकरांकडून विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. अंबा नदीची पातळी खाली गेल्याने पाणी कमी प्रमाणात मिळत होते; परंतु त्यावर उपाययोजना म्हणून जॅकवेलच्या विहिरीतून गाळ काढण्यात आला आहे. आता पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे पाली ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर दुर्गे, श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले. पाली शहर हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. यामुळे पालीमधील विविध सरकारी कार्यालय आणि सुधागड तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून, पाली शहराची मोठी लोकसंख्या आहे.
शहराला अंबा नदीपासून पाणीपुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपासून पूर्वी परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी दूषित, गढूळ झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जॅकवेलच्या विहिरीत गाळ जमा झाला होता. म्हणून काही दिवसांपूर्वीच पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. ग्रामपंचायतीमार्फ त १९ आॅक्टोबर रोजी जॅकवेलच्या विहिरीतून व जवळील गॅलरीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया न करता, थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते, अशाप्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.
पाली हे अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. पालीची लोकसंख्याही १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ पाणी व दूषित पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळातून चक्क जीवंत साप, खुबे, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लाल फितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.