प्रकल्पाच्या भरावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:25 AM2020-11-28T02:25:26+5:302020-11-28T02:25:34+5:30
उरण - नेरूळ रेल्वेचे काम
उरण : नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरीत्या संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या योग्य नुकसानभरपाई आणि इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी कोटनाका येथे सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या भरावाचे काम डम्पर अडवून बंद पाडले. उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरिता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरीत्या संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य प्रकारे मोबदलाही देण्यात आलेला नाही. या रेल्वे प्रकल्पात प्रकल्पबाधितांना नोकरीतही सामावून घेण्यात आलेले नाही. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला नाही.
स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था, काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी कोटनाका येथे सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाचे काम बंद पाडले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा प्रकल्पबाधितांनी दिला आहे. या वेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नवनीत भोईर, हेमदास गोवारी, नीलेश पाटील, सुनील भोईर, सूरज पाटील, भालचंद्र भोईर, महेश भोईर, कृष्णा जोशी, नीलेश पाटील, पुरुषोत्तम पाटील, सुरेश पाटील, चेतन पाटील, प्रसाद गोवारी, अजित भोईर, राजेश भोईर आदी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था, काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.