रस्त्यासाठी ग्रामस्थांचा ठिय्या, संतप्त आंदोलकांचा उपअभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:07 AM2019-02-22T05:07:06+5:302019-02-22T05:07:37+5:30

शिरवली-माणकुले रस्त्याची दुरवस्था : संतप्त आंदोलकांचा उपअभियंत्यांना घेराव

Villagers strain for the road, surrounded by deputy superiors of angry protesters | रस्त्यासाठी ग्रामस्थांचा ठिय्या, संतप्त आंदोलकांचा उपअभियंत्यांना घेराव

रस्त्यासाठी ग्रामस्थांचा ठिय्या, संतप्त आंदोलकांचा उपअभियंत्यांना घेराव

googlenewsNext

अलिबाग : तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली. रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना किती त्रास सहन करावा लागत आहे याची माहिती होण्यासाठी कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे हे गावात स्पॉट व्हिझिट देत नाहीत तोपर्यंत उपअभियंता मधुकर चव्हाण यांना ओलीस ठेवण्यावर आंदोलक ठाम राहिल्याने तेथे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कार्यकारी अभियंता मोरे यांनी आंदोलकांची मागणी मान्य करत गावात भेट देण्याचे मान्य केल्याने आंदोलकांनी माघार घेतली.

शिरवली-माणकुले रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार ४ जानेवारी २०१७ रोजी रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आली. सुमारे १० कोटी रुपये दोन किलोमीटर रस्त्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. मात्र दोन वर्षे होत आली तरी रस्त्याचे काहीच काम झालेले नाही. रस्ता प्रचंड खराब झाल्याने प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येत होता, परंतु संबंधित विभागाकडून चालढकल करण्यात येत होती. अखेर गुरुवारी ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी थेट अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे हे कामानिमित्त बाहेर होते त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले. त्यांनी आक्रोश व्यक्त करत मोरे यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. ग्रामस्थांनी आंदोलकांची भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. उपअभियंता मधुकर चव्हाण यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कार्यकारी अभियंता मोरे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

संतापलेल्या आंदोलकांनी चव्हाण यांना घेराव घातला. मोरे हे गावात येऊन रस्त्याची पाहणी करत नाहीत तोपर्यंत उपअभियंता चव्हाण यांना ओलीस ठेवण्यात येत असल्याचे आंदोलकांनी मोरे यांच्याशी फोनवर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मिटिंगनिमित्त बाहेर असल्याने येता येणार नसल्याचे मोेरे यांनी सांगितले. नेहमीच तुम्ही मिटिंगमध्ये असता ग्रामस्थांच्या रस्त्याचे प्रश्न सोडवणार कोण असा प्रश्न माणकुले ग्रामपंचायतीचे सरपंच सुजित गावंड यांनी केला. चव्हाण यांना ब्लडप्रेशर, शुगरचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना ओलीस ठेवू नका कितीही उशीर झाला तरी गावात येतो, असे आंदोलकांना मोरे यांनी आश्वासित केले. त्यानंतर आंदोलकांनी लेखी आश्वासन घेऊन माघार घेतली. याप्रसंगी माणकुलेच्या उपसरपंच पल्लवी पाटील, रमाकांत म्हात्रे, सुनील थळे यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात त्रास
च्२०१७ मध्ये रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे; परंतु दोन वर्षे झाली तरी चिंतामणी कन्स्ट्रक्शनने काहीच काम केलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
च्यंदाच्या पावसाळ््याआधी काम केले नाही तर, आहे तो रस्ताही पाण्याखाली जाईल. त्यामुळे बहिरीचापाडा, माणकुले, नारंगीचा टेप, गणेशपट्टी, बंगला बंदर येथील सुमारे पाच हजार लोकांचा संपर्क तुटेल, असे ग्रामस्थ चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जानेवारी २०१७ मध्ये या रस्त्याच्या कामासाठी दहा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या कामाचा ठेका हा चिंतामणी कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला आहे. त्यांनी काही प्रमाणात पिंचिंगचे काम केले आहे. मात्र, सध्या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने कामाला गती येत नाही. निधी उपलब्ध झाल्यावर काम पूर्ण करण्यात येईल.
- मधुकर चव्हाण, उपअभियंता

च्संतापलेल्या आंदोलकांनी चव्हाण यांना घेराव घातला. मोरे हे गावात येऊन रस्त्याची पाहणी करत नाहीत तोपर्यंत उपअभियंता चव्हाण यांना ओलीस ठेवण्यात येत असल्याचे आंदोलकांनी मोरे यांच्याशी फोनवर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Villagers strain for the road, surrounded by deputy superiors of angry protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.