आधाराविना परातीत उभे मुसळ पाहून गावकरी अचंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:38 PM2019-12-28T23:38:10+5:302019-12-28T23:38:27+5:30
सूर्यग्रहणाची किमया; अजब दृश्य पाहण्यासाठी खर्डी खुर्द गावात गर्दी
माणगाव : संपूर्ण महाराष्ट्रात २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८ ते ११.४७पर्यंत सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणावेळी माणगाव तालुक्यातील माणगावपासून ८ कि.मी. असलेल्या खर्डी खुर्द गाव येथील घराच्या अंगणात जुन्या पारंपरिक पद्धतीनुसार एका मोठ्या ताटात (परातीत) पाणी ठेवून त्यामध्ये भात कुटण्याचे ४ फूट उंच आणि ४ इंच गोलाकार मुसळ आधाराशिवाय सहजी उभे केले होते. हे लाकडी मुसळ या सूर्यग्रहणाऐवजी इतर वेळी कधीही आधाराविना उभे राहू शकत नाही; परंतु ते सूर्यग्रहणाच्या वेळी उभे राहते असे जुनेजाणते गावकरी सांगतात. हे अजबदृश्य पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी के ली होती.
या सूर्यग्रहणाबद्दल खर्डी खुर्द येथील एक वयोवृद्ध महिला नाभीबाई मोरे म्हणाल्या की, सूर्यग्रहणावेळी गरोदर मातेने, लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, आपल्या घरातील देवांवर कोणाचीही नजर पडू नये यासाठी काहीतरी कापड टाकून त्यांना झाकून ठेवावे. ज्यावेळी आपण ताटामध्ये (परातीमध्ये) मुसळ उभे करतो तेव्हा ग्रहण सुटण्यासाठी देवाकडे याचना केली जाते की, ‘सोड गिºहाण... आमच्या देवाला सोड..! त्यावेळी त्याला हळद-कुंकू, तांदूळ वाहून त्याच्या पाया पडायचे आणि त्यानंतर ज्यावेळी ग्रहण सुटते; त्यावेळी ते मुसळ आपोआप खाली पडते अन्यथा पडत नाही. यंदा वर्षाअखेरीस आलेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशीच सकाळी आणि आदल्या दिवशीही रात्री अवकाळी पाऊस पडला. आकाश पूर्ण ढगाळलेले होते. त्यामुळे या ठिकाणी सूर्यग्रहण नीट पाहावयास मिळाले नाही.
लोक म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुतूहलाने या ग्रहणाकडे पाहणारे आणि आध्यात्मिक पारंपरिकतेने पाहणारे या दोघांनाही सारखाच विचार करायला भाग पाडणारे चित्र या ग्रहणामुळे पाहावयास मिळत आहे.