साळविंडे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:37 PM2019-01-31T23:37:40+5:302019-01-31T23:37:57+5:30
म्हसळा वनविभागाचे सहकार्य; टंचाई काळात होणार साठलेल्या पाण्याचा उपयोग
म्हसळा : संयुक्त वन व्यवस्थापन समिती साळविंडे देवळाचीवाडी ग्रामस्थांनी रोहा वनविभाग म्हसळा परिक्षेत्राच्या मदतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे. पाणीटंचाईच्या काळात सुमारे १० हजार लिटर पाणी साठेल, एवढ्या क्षमतेचा गावाशेजारील नदीपात्रात वनराई बंधारा बांधून शासनाच्या ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ मोहिमेस सुरुवात केली आहे.
परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरणाक, वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांचे मार्गदर्शन घेऊन साळविंडे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधकाम करण्यासाठी २५० मातीबंद पिशव्यांच्या मदतीने पाणी साठवण बंधारा दिवसभरात पूर्ण केल्याची जांभुळ बिट वनरक्षक सूर्यतळ यांनी माहिती दिली व वनराई बंधाऱ्याचे महत्त्व ग्रामस्थांना विशद केले. बांधण्यात आलेल्या साठवण बंधाºयातील पाणी ग्रामस्थ शेतकरी, वन्यजीव आणि पशूपक्षी यांना पिण्यासाठी उपयोगास येणार आहे.
रोहा वनविभाग उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनसंरक्षक केसरनाथगोडबोले, म्हसळा परिक्षेत्र वनाधिकारी नरेश पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यात मोठ्या लोकवस्ती असलेल्या गावांत वनविभागाच्या सर्व प्रकारच्या शासनाच्या योजनांंचा लाभ दिला जात असल्याने ग्रामस्थ आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा वनविभागाबाबत विश्वास वाढला आहे, यामुळे वृक्षतोड कमी होऊन वनसंरक्षण, वृक्षलागवड, वन्यजीव संरक्षण कामात वाढ होत असल्याचे परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरणाक यांनी सांगितले. साळविंडे संयुक्त वन ग्राम समितीचे उत्कृष्ट कामाचे मोल व्हावे, यासाठी वनविभाग जांभुळ बिट मार्फत या समितीला संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांनी सांगितले.
बंधारा बांधकाम करण्यासाठी वन समिती अध्यक्ष महादेव तावडे, समाजसेवक रामशेठ पारदुले, लक्ष्मण शिंदे, पांडुरंग सातप आदीसह सुमारे १०० ग्रामस्थ महिला मंडळाने सहभाग घेतला होता. साळविंडे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधण्यात मोलाचे योगदान दिले, त्याबद्दल म्हसळा वनविभागाने त्यांना धन्यवाद दिले.