गावे, शहरे चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:57 AM2018-05-14T05:57:26+5:302018-05-14T05:57:26+5:30
ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्राचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सोमवारी साजऱ्या
अलिबाग : ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्राचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सोमवारी साजऱ्या होणाºया वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विशेष स्वच्छता मोहिमेत रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील श्री सदस्य मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
विविध सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन्स आणि सार्वजनिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आपल्या सद्गुरूंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना स्वच्छतेची अनोखी भेट देण्याची सुप्त इच्छा सहभागी श्री सदस्यांमध्ये दिसून येत होती. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये रविवार असून देखील अधिकारी व कर्मचारी आवर्जून या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून आले.
तालुक्यात ६० किमी रस्त्याच्या दुतर्फातील ५९ टन कचरा उचलण्यात आला. यासाठी ३,४८७ मनुष्यबळाचा वापर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्या हस्ते अलिबाग समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अलिबाग शहरातील ग्रामपंचायतींमध्ये देखील सफाई मोहीम राबवण्यात आली. १६.६० टन ओला कचरा आणि ४२.६० टन सुका असा एकूण ५९ टन कचरा गोळा करून विविध ५८ वाहनांमधून तो डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात आला.