रोहा-अष्टमीतील गावांचा संपर्क तुटला; वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:30 PM2019-08-03T23:30:38+5:302019-08-03T23:30:53+5:30

वरसे, रोठ, धाटावमध्ये शिरले पाणी; प्रवासी रखडले

The villages in Roha-Ashtami lost contact | रोहा-अष्टमीतील गावांचा संपर्क तुटला; वाहतूक खोळंबली

रोहा-अष्टमीतील गावांचा संपर्क तुटला; वाहतूक खोळंबली

Next

रोहा : तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रोह्याच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडत गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण केली आहे. पुरामुळे रोहा-अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर ४ ते ५ फूट पाणी होते तर नव्याने बांधण्यात आलेल्या उंच पुलाला यंदा प्रथमच पाणी लागले आहे. पुरामुळे संपर्क तुटल्याने वाहतूक खोळंबली, आणि प्रवासीही मोठ्या संख्येने रखडले आहेत. रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटावमध्ये पुराचे पाणी शिरले.

शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले. धुवाधार पावसाने कुंडलिका नदीला पूर आला. रात्री ९ नंतर नदीची पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे रोहा शहरातील नगरपालिका चौक, सावरकर मार्ग, कोर्ट रोड, मुख्य बाजारपेठ, सत्यनारायण रोड, बोहरी गल्ली, फिरोज टॉकीजलगत आदी सखल भागात पाणी साचले. पुराचे पाणि बायपास रोड, दमखाडी, रायकर पार्क, चनेवाले कॉम्प्लेक्स, डबीर चाळ, गोकुळ बिल्डिंग, मुरुड रोड, अष्टमीसह वरसे, रोठ, धाटावमध्ये शिरले. रात्रीच्या वेळी वस्तीत पाणी शिरू लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अष्टमीत रस्त्यावर पाणी भरल्याने पलीकडील गावांचा संपर्क तुटला.

कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे, रोठ आधी नदीलगतच्या परिसरात पुराचे पाणी शिरले. रोठ आणि उडदवणे दरम्यान नदीवरील पालदाड पुलाला लागून पाणी वाहत होते. रात्रीपासून वाहतूक बंद राहिल्याने विद्यार्थी, कामगार, एस.टी. बसेस, कंपनी बसेस इत्यादींना सतर्कतेच्या कारणास्तव थांबविण्यात आले होते. शनिवारी बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

रोहे तालुक्यात ठिकठिकाणी पाणी शिरल्याने ११६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या ४८ तासांपासून पावसाने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपले असतानाच पुढील ४८ तास धुवाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे, धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे, अतिवृष्टीमुळे कुंडलिकेच्या पातळीत वाढ झाली आहे. तरी नदीकाठच्या रहिवाशांनी सावध राहावे.
- संतोष पोटफोडे, नगराध्यक्ष, रोहा नगरपरिषद

Web Title: The villages in Roha-Ashtami lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस