विनिता गणेश दिवकर खून प्रकरणी चार महिला आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:43 PM2018-08-31T15:43:07+5:302018-08-31T15:43:40+5:30

जमा होणा-या दंडाच्या रकमेपैकी 30 हजार रुपये मृत विनिता हिचा मुलगा प्रथमेश यास नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही निर्णय न्यायालयाने दिला आहे. 

Vinita Ganesh Diwkar murder case of four women accused of life imprisonment | विनिता गणेश दिवकर खून प्रकरणी चार महिला आरोपींना जन्मठेप

विनिता गणेश दिवकर खून प्रकरणी चार महिला आरोपींना जन्मठेप

Next

- जयंत धुळप

अलिबाग : रोहा तालुक्यातील सोनखार-न्हावे येथील विनिता गणेश दिवकर हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविले, त्यानंतर तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी सविता उर्फ मनाली मिननाथ कटोरे, कमलाय महादेव बसवत, ललिता प्रदीप पाटील, सुरेखा उर्फ प्रणाली पांडुरंग दिवकर या चार महिलांना माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी दोषी ठरवून भा.दं.वि.कलम 302 अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा शुक्रवारी सुनावली आहे. तसेच,  जमा होणा-या दंडाच्या रकमेपैकी 30 हजार रुपये मृत विनिता हिचा मुलगा प्रथमेश यास नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही निर्णय न्यायालयाने दिला आहे. 

सामूहिक लाईट बिल व घरपट्टी भरण्याचा वाद 

सुरेखा उर्फ प्रणाली पांडुरंग दिवकर या विनिताच्या जाऊ आहेत, तर पांडुरंग जानू दिवकर हे नात्याने दीर आहेत. फिर्यादी गणेश दिवकर व आरोपी सुरेखा दिवकर व पांडुरंग दिवकर हे वडिलोपार्जित घरात वेगवेगळे राहातात. दोन्ही घरांमध्ये एकच सामायिक विजेचे मीटर आहे. विजेचे मीटर आरोपी सुरेखा व पांडुरंग यांच्या खोलीमध्ये आहे. मिटरचे येणारे लाईट बिल व घरपट्टी विनिताचे पती गणेश दिवकर आणि आरोपी पांडुरंग दिवकर हे निम्मे-निम्मे भरत होते.

तिघींनी पकडून ठेवले, एकीने रॉकेल ओतून पेटविले...

 4 सप्टेंबर 2012 रोजी विनिता हिच्या मुलाचा वाढदिवस असल्याने पती गणोश याला केक आणण्यास सांगितले होते. त्यावेळी आरोपी पांडुरंग दिवकर याने या दोघाना विजेचे बिल आणून दाखविले. त्यावेळी लाईट बिल व घरपट्टी भरण्यावरुन वाद झाला. विनिता हिला सविता कटोरे, कमलाय बसवत, ललिता पाटील या तीन आरोपींनी तिला पकडून ठेवले तर सुरेखा दिवकर हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या प्रकारात विनिता गंभीररित्या भाजल्याने तिला प्रथम अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात व नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यानच विनिताचा मृत्यू झाला. 

न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यांती निकाल

    रोहा पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि.कलम 302,504 व 34 अन्वये गुन्हा दाखल करुन रोह्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एम.सोळसे यांनी तपास पूर्ण करुन आरोपीं विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश आर.व्ही.लोखंडे यांच्या न्यायालयात झाली. सहाय्यक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्यावतीने सुनावणी दरम्यान उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय न्यायालयासमोर सादर केले. तत्कालीन तहसिलदार मिलिंद मुंढे यांची साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली. उभय पक्षाचा युक्तीवाद व न्यायालया समोर आलेल्या साक्षी पुराव्यांती न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 

Web Title: Vinita Ganesh Diwkar murder case of four women accused of life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.