अलिबागमध्ये आचारसंहितेच्या धसक्याने विकासकामांच्या कोनशिला झाकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:45 PM2019-03-11T23:45:13+5:302019-03-11T23:45:37+5:30
मतदारांना तक्रार करण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन
- आविष्कार देसाई
अलिबाग : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा यावर निर्बंध आले आहेत. याच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश विकासकामांच्या पाट्या, फलक, कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास आता मतदारांनी थेट तक्रार करण्याचे आवाहनही निवडणूक विभागाने केले आहे.
देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील तब्बल एक महिनाभर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार असल्याने ऐन उन्हाळ््यात पारा चांगलाच चढलेला असणार आहे.
निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष, प्रशासनाने नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे. आचारसंहितेचे कसे पालन करायचे आहे याबाबत स्पष्ट आदेश निवडणूक विभागाने जारी केले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवणे, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटना, घोषणा अथवा निर्णय घेता येणार नाहीत. त्याचप्रमाणे स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे, सरकारी वाहनांचा वापर, अनुदानाचे वाटप, सरकारी जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांचे उद्घाटन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, बैठकांवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करण्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. राजकीय पक्षांनी आतापर्यंत विकासकामे केलेली आहेत. विकासकामे, योजना यांची माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी कोनशिला, फलक लावण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयात अशा विकासकामांच्या पाट्या, कोनशिला फलक मोठ्या संख्येने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो असे गृहीत धरून बहुतांश पाट्या, फलक कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अलिबागमधील विकासकामांच्या पाट्यांचा समावेश आहे.
प्रत्येक राजकीय पक्षाने, उमेदवाराने आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी मतदारांनीही सक्रिय होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदार आपल्या मोबाइल फोनद्वारे ‘सी-व्हीजल अॅप’च्या साहायाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. प्रत्येक तक्रारदारास त्याच्या तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती १०० मिनिटात देणे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. तक्रारदारांच्या इच्छेनुसार तक्रारीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.