रायगड जिल्ह्यात १३ हजार ९९२ गणेशमूर्तींचे विसर्जन, भपकेबाजपणाला आळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:02 AM2020-09-03T01:02:45+5:302020-09-03T01:03:03+5:30
उत्सव कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये. यासाठी सरकार आणि प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध, अटी लादल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बाप्पाच्या उत्सवातही अजिबात भपकेबाजपणा नव्हता.
रायगड : जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी १४४ सार्वजनिक आणि १३ हजार ८४८ खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नाही. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानेच बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले. त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या परंपरेला छेद देत, नवीन अध्याय लिहिण्यात आल्याचे बोलले जाते.
जिल्ह्यात बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. बाप्पाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक अगदी धूमधडाक्यात काढण्यात येते. ढोल-ताशा पथक, डीजेच्या तालावर ठेका धरून नाचणारे अबालवृद्ध, नवीन साड्या परिधान करून मिरवणारा महिला वर्ग मात्र यावेळी कोठेच दिसून आला नाही.
उत्सव कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये. यासाठी सरकार आणि प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध, अटी लादल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बाप्पाच्या उत्सवातही अजिबात भपकेबाजपणा नव्हता. सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी नियमात राहूनच बाप्पाचा सण साजरा केला.
बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यांवर कोठेच नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी विसर्जन ठिकाणी भाविकांना जाण्यास मज्जाव केला होता. बाप्पाची मूर्ती भाविकांना प्रशासनाच्या ताब्यात द्यावी लागत होती.
प्रशासनाने नेमलेल्यात जीवरक्षकांमार्फत बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे भाविकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.
पोलीस मुख्यालयाच्या बाप्पाला बुधवारी निरोप
अलिबाग पोलीस मुख्यालयातही बाप्पाचे आगमन झाले होते. पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या बाप्पाला त्यांनी २ सप्टेंबर रोजी निरोप दिला. तेही दरवर्षी बाप्पाला वाजतगाजत मिरवणूक काढून निरोप देत असतात. मात्र, यावेळी त्यांनीही साधेपणाने बाप्पाला निरोप दिला.
विसर्जन भक्तिमय वातावरणात
आगरदांडा : ‘पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला’ अशा जयघोष नामस्मरणात अनंत चतुर्दशीच्या गणरायांना भक्तिमय वातावरणात व थाटामाटात निरोप देण्यात आला. गणेशभक्त आपले घरगुती गणपती टेम्पो, रिक्षामधून नेत होते. ‘कोरोनाचे संकट दूर कर, सर्वांना सुखी ठेव’ अशी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. मुरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील विसर्जन स्थळावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डीजऐवजी भजन-कीर्तन
श्रीवर्धन : मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी डीजे व इतर वाद्यवृंद यांचा वापर मिरवणुकीत केला जात असे. मात्र, या वर्षी मिरवणुकीस बंदी होती. या वर्षी भजनाला व नाम घोषाला पसंती दिली. अकरा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी कमी गर्दी समुद्र किनाºयावर जमा झाल्याचे निदर्शनास आली. पुढच्या वर्षी भारताला कोरोनामुक्त कर, अशी प्रार्थना अनेकांनी गणरायाकडे केली.
म्हसळामध्ये भावपूर्ण निरोप
म्हसळा : दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना निरोप देण्यात आला. मंगळवारी दुपारनंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. कोणतेही वाद्य, मिरवणूक, तसेच गुलालाची उधळण न करता, विसर्जन करण्यात आले. भजन न करता विसर्जन करणे ही पहिलीच वेळ होती.विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी रस्ते व विसर्जन घाटावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
करण्यात आला होता.
रेवदंडामधील किनारा सुनासुना
रेवदंडा: अनंत चतुर्दशीला रेवदंडा व थेरोडा अशा दोन्ही ठिकाणच्या समु्द्र किनाºयावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी सजवलेल्या हातगाड्या, वाहनांतून आणल्या जातात. त्यामुळे गणेशभक्तांनी परिसर फुलून जातो. यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या विसर्जन सोहळ्याला गणेशभक्त साध्या पद्धतीने विसर्जन करण्यासाठी समुद्रावर आल्याने, अनेकांना अनंत चतुर्दशी आहे किंवा नाही हे समजलेच नाही. त्यामुळे किनारा सुना सुना दिसत होता. पोलीस यंत्रणा मात्र दरवर्षीप्रमाणे चौकाचौकात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिसत होती.
कर्जतमध्ये १,१२० गणरायांचे विसर्जन
कर्जत तालुक्यात सार्वजनिक ८, खासगी ४२४, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासगी ६६३ आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासगी २५ अशा एकूण १,१२० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
कृत्रिम तलावांमध्ये दीड दिवसांच्या विसर्जन केलेल्या मूर्तींची विल्हेवाट लावताना जो प्रकार झाला, तो बघता बहुतांश भाविकांनी उल्हास नदीत बाप्पाचे विसर्जन केले.
दहिवली, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, आकुर्ले, गुंडगे गावातील भाविकांनी गणेश घाटावर विसर्जन केले. उगले परिवाराच्या बाप्पाला १०७ वर्षांची परंपरा आहे. त्यांच्या बाप्पाचे नगरपरिषेदेच्या कृत्रिम तलावात विसर्जन झाले.