- नामदेव मोरेनवी मुंबई : गागोदे बुद्रुक येथील आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने विनोबाजींच्या १३० वर्षे जुन्या वाड्याचे जतन व संवर्धन केले आहे. नियमितपणे देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यांच्या वस्तू, पुस्तकेही नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली असून येथील ग्रामस्थही त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी धडपडत आहेत. लोकवर्गणीतून जयंती सोहळा साजरा करण्यात येत असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आचार्य विनोबा भावे यांचे जन्म गाव गागोदे बुद्रुक शासन दरबारी उपेक्षितच राहिले आहे. भूदान चळवळीच्या माध्यमातून तब्बल ४७ लाख ६३ हजार ६७६ एकर जमीन गरिबांसाठी उपलब्ध करणाºया विनोबाजींच्या जन्मगावी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दुर्दैवाने अद्याप उभे राहू शकले नाही. शासनाने गावाकडे दुर्लक्ष केले असले तरी आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने विनोबाजींचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याचे प्राणपणाने जतन केले आहे. गागोदे गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी विनोबाजींचे घर आहे. भावे कुटुंबीयांनी १८ एप्रिल १९५५ मध्येच जन्मघर सर्वोदयाच्या कार्याला दिले आहे. २२ नोव्हेंबर १९८५ मध्ये जन्मघराचा ट्रस्ट करण्यात आला असून त्या माध्यमातून घराची देखभाल केली जात आहे. ज्या खोलीमध्ये विनोबाजींचा जन्म झाला तेथे तैलचित्र लावण्यात आले आहे. त्यांच्या वापरातील कपडे, वस्तू, हस्ताक्षरातील मूळ पत्रे, विनोबांचा प्रकाशित पोस्टाचा स्टॅम्प, जुने दस्तऐवज, शेतात सापडलेले मूळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाणे या ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. विनोबांचे समग्र साहित्य छायाचित्र अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. विनोबांच्या जीवनावरील फिल्म दाखविण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी टी. व्ही. नादुरुस्त झाल्यामुळे ती सुविधा बंद करण्यात आली आहे.गागोदेमधील विनोबाजींच्या जन्मघराची देखभाल वि. प्र. दिवाण हे अनेक वर्षांपासून करत आहेत. सरिता राजभर या सेवेकरीही येथील देखभालीचे काम करत आहेत. आश्रमात आजही पाच वाजता प्रार्थना होते. या प्रार्थनेमध्ये कधीच खंड पडून दिला जात नाही. आश्रमात रोज एक तास सूतकताई केली जात आहे. वाड्याच्या बांधकामामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. जमीन शेणाने सारवून घेतली जात आहे. प्रत्येक खोलीची नियमित साफसफाई ठेवली जात आहे. वाड्यात कोणी नसले तरी दरवाजाला कडी किंवा कुलूप लावले जात नाही. येथे येणाºया नागरिकांना पाहण्यासाठी घर खुले ठेवण्यात आले आहे. छोटीशी गोशाळा सुरू ठेवण्यात आली असून घराच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीवर भात व इतर शेती केली जात आहे. ग्रामस्थही विनोबाजींच्या स्मृती जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ११ सप्टेंबरला जयंतीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येतो. गावामध्ये जनजागृतीपर रॅलीचेही आयोजन करण्यात येते.जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमगागोदे ग्रामस्थ जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात. यावर्षीही गावामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. याशिवाय गावामध्ये जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीच्या कार्यक्रमाला राज्यातून व देशातून जवळपास ७०० पेक्षा जास्त नागरिक आले होते. ग्रामस्थ वर्गणी काढून विनोबाजींच्या जयंतीचा कार्यक्रम करत असून त्यांचे विचार व स्मृती जपण्याचे काम करत आहेत.विनोबाजींच्या जन्मघरातील टी. व्ही. बंदआचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानच्यावतीने गागोदेमधील घराची देखभाल केली जात आहे. याठिकाणी देशभरातून विनोबाजींचे चाहते भेट देण्यासाठी येतात. बिहार व इतर राज्यातून आलेले नागरिक गागोदेमधील माती कपाळाला लावून या भूमीला वंदन करतात. भेट देणा-या नागरिकांना विनोबाजींच्या कार्याची माहिती देणा-या चित्रफिती टी. व्ही. वर दाखविण्यात येत होत्या, परंतु सहा महिन्यांपूर्वी टी. व्ही. बंद पडला आहे. ट्रस्ट सरकारी व विदेशी देणगी घेत नाही. पूर्णपणे लोकांच्या देणगीवर येथील व्यवस्था केली जात आहे. नवीन टी. व्ही. मिळाला नसल्याने नागरिकांना चित्रफीत दाखविता येत नसल्याची खंत व्यक्त केली जावू लागली आहे.जन्मगाव, जन्मघरातील महत्त्वपूर्ण घटना१६५५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने गावाच्या खिंडीत कल्याणचा खजिना लुटला गेला.११ सप्टेंबर १८९५ : विनोबाजींचा जन्म१९१७ : लोकमान्य टिळकांचे गावामध्ये आगमन१४ ते १७ एप्रिल १९३६ : विनोबांची गावाला शेवटची भेट२३ डिसेंबर १९५४ : भावे कुटुंबाने स्वत:ची जमीन भूदानात दिली१८ एप्रिल १९५५ : भावे कुटुंबाने विनोबांचे जन्मघर सर्वोदयाच्या कार्याला दिले.६ एप्रिल १९५९ : विनोबांच्या जन्मघरातून सर्वोदय आश्रमाच्या कार्यास प्रारंभ१९५५ ते १९७० : आश्रमाच्या प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील ३७३८ एकर जमीन भूदान मिळाली. १३१ गावे ग्रामदान झाली.३ फेब्रुवारी १९६३ : गागोदे गाव ग्रामदान घोषित. ११ सप्टेंबर १९७३ रोजी गाव कायदेशीर ग्रामदान झाले२२ नोव्हेंबर १९८५ : जन्मघराचा ट्रस्ट रजिस्टर करण्यात आला.
विनोबाजींच्या वाड्याचे प्रतिष्ठानकडून जतन, १३० वर्षांच्या स्मृती, वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:27 AM