कर्नाळ्याला चार वर्षांत ३ लाख पर्यटकांची भेट, पक्षी निरीक्षण हंगामाला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:02 AM2018-11-07T04:02:46+5:302018-11-07T04:03:50+5:30

राज्यातील प्रमुख पक्षी अभयारण्यामध्ये कर्नाळ्याचा समावेश होत आहे. चार वर्षांमध्ये तब्बल ३ लाख ३१ हजार पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे.

A visit of 3 lakh tourists to Karnala in four years, response to bird watching season | कर्नाळ्याला चार वर्षांत ३ लाख पर्यटकांची भेट, पक्षी निरीक्षण हंगामाला प्रतिसाद

कर्नाळ्याला चार वर्षांत ३ लाख पर्यटकांची भेट, पक्षी निरीक्षण हंगामाला प्रतिसाद

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई - राज्यातील प्रमुख पक्षी अभयारण्यामध्ये कर्नाळ्याचा समावेश होत आहे. चार वर्षांमध्ये तब्बल ३ लाख ३१ हजार पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे. यावर्षीच्या पक्षी निरीक्षण हंगामालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. विदेशी पर्यटकही याठिकाणी भेट देऊ लागले आहेत. येथील नैसर्गिक संपत्ती टिकविण्यात वनविभागाला यश आले असून, पर्यटकांनाही जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष दिले जात आहे.

मुंबई, ठाणे व नवी मुंबईमध्ये सिमेंटच्या जंगलात राहून कंटाळलेल्या नागरिकांसाठी कर्नाळा अभयारण्य स्वर्गाप्रमाणे भासू लागले आहे. मुंबई- गोवा महामार्गावर १२.११ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रथम १९६८ मध्ये कर्नाळा किल्ला व परिसर राखीव करण्यात आला व पुढे २००३ मध्ये कल्हे, रानसई, कोरल, आपटा, घेरावाडी व तुराडे गावातील परिसर अभयारण्याला जोडण्यात आला. देशातील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांचे अभयारण्याच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे.

सद्यस्थितीमध्ये येथे ६४२ प्रकारचे वृक्ष, वेली, वनौषधी, दुर्मीळ वनस्पती आहेत. तब्बल १३४ प्रकारचे स्थानिक व ३८ स्थलांतरित पक्षी येथे पाहावयास मिळत आहेत. तब्बल ६४२ प्रकारच्या वनस्पती प्रजाती अस्तित्वात आहे. यावर्षीचा पक्षी निरीक्षण हंगाम आॅक्टोबरमध्येच सुरू झाला आहे. पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वनविभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक वर्षी ७५ हजार ते ९० हजार पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. २०१४ - १५ ते २०१७ - १८ या कालावधीमध्ये तब्बल ३ लाख ३१ हजार ११ पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली आहे. प्रवेश, वाहन व कॅमेरा शुल्कातून या कालावधीमध्ये तब्बल १ कोटी ४४ लाख ५९५५ रुपये महसूल जमा झाला आहे.

अभयारण्य वनसंरक्षक (वन्यजीव) ठाणे यांच्या अखत्यारीत येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांच्या टीमने पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अभयारण्याच्या बाहेर वाहने उभी करण्यासाठीचे नियोजन केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, चेंजिंग रूम उभारण्यात आली आहेत. माहिती केंद्र सुरू केले आहे. अभयारण्यात प्रवेश करण्याच्या ठिकाणीच पक्षी निरीक्षणाविषयीच्या ठिकाणांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभयारण्याविषयी माहिती देणारी पत्रके तयार केली असून त्यावर सविस्तर तपशील देण्यात आला आहे. वार्षिक पर्यटकांची संख्या १ लाखावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

किल्लाही ठरतोय आकर्षण

कर्नाळा किल्ला पाहण्यासाठीही पर्यटक गर्दी करू लागले आहेत. समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर किल्ला आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये हा किल्ला जिंकला. पुरंदरच्या तहामध्ये तो मोगलांच्या ताब्यात देण्यात आला. १६७० मध्ये तो पुन्हा मराठा साम्राज्यात परत आला आहे. महामार्गावरून जाताना किल्ल्याचा सर्वात वरील सुळका पर्यटकांना आकर्षित करत आहे. किल्ल्याच्या पायथ्याचे पाणवटे व रानवाटातून किल्ल्यापर्यंत जाण्याचा मार्ग पर्यटकांना आकर्षित करत असून, किल्ला पाहण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

विदेशी पर्यटकांचीही हजेरी

कर्नाळा अभयारण्याला विदेशी पर्यटकही भेट देत असतात. जानेवारी ते आॅक्टोबर दरम्यान १८८ विदेशी नागरिकांनी भेट दिल्याची नोंद झाली आहे. अभयारण्यामध्ये स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक याठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत.

कर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांसाठी निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. निसर्गवाटा निश्चित करण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- प्रदीप चव्हाण,
वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा

Web Title: A visit of 3 lakh tourists to Karnala in four years, response to bird watching season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.