नेरळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे लोणावळा आणि खंडाळा घाट सेक्शन येथील कामांच्या पाहणी दौऱ्यासाठी लोणावळा रेल्वे स्थानक येथे आल्यानंतर त्यांनी कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. त्यांनी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
शक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे कर्जत रेल्वे स्थानकात आल्यानंतर कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सदस्यांसोबत स्थानकातील सोयी सुविधा व समस्यांबाबतचर्चा केली. असोसिएशनने या वेळी स्थानकातील अनेक मंजूर असलेली कामे फलाट क्रमांक एक व दोनवरील निवारा शेडवर छप्पर टाकणे, फलाट क्रमांक तीनला मुंबई दिशेकडील पादचारी पूल जोडणे, सरकत्या जिन्याचे आणि उदवाहनाचे काम सुरू करून पूर्ण करणे, भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकीच्या वेळा वाढविणे आदी समस्यांबाबत चर्चा केली. त्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन या वेळी महाव्यवस्थापकांनी दिले.
तसेच नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या पार्किंग तसेच हॉलचे उद्घाटन महाव्यवस्थापकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नेरळ प्रवासी संघाने त्यांचे स्वागत करून नेरळ स्थानकातील अपूर्ण निवारा शेड पूर्ण करणे, पादचारी पूल उभारणे, सरकता जिना उभारणे, या समस्या सोडविण्याची विनंती महाव्यवस्थापकांना केली. या वेळी महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रवाशांसाठी या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर आणि पदाधिकाºयांना दिले. महाव्यवस्थापक येणार असल्याने नेरळ स्थानकात लगीनघाई सुरू होती. संपूर्ण परिसर आणि रस्ते चकाचक करण्यात आले होते.या वेळी कर्जत रेल्वे असोसिएशनचे अध्यक्ष केतन शाह, कार्याध्यक्ष सुरेश खानविलकर, सचिव प्रभाकर गंगावणे, नेरळ प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, राजेश गायकवाड, मिलिंद विरले, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, नेरळचे सरपंच राजवी शिंगवा, सर्व सदस्य आदी उपस्थित होते.