- संजय करडे मुरुड : तालुक्यातील राजपुरी गावात असणाऱ्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास सन २०१९ या वर्षात देश -विदेशातील सुमारे साडेचार लाख पर्यटकांनी भेट दिली. चारही बाजूला समुद्र व मध्यभागी हा किल्ला असल्याने पर्यटकांना शिडांच्या होड्यांमधून प्रवास करून या किल्ल्यावर पोहोचावे लागते. जंजिरा हा किल्ला ३५० वर्षांपूर्वी बांधलेला असूनसुद्धा पूर्वी जसा होता तसाच ताठ मानेने व दिमाखात हा किल्ला उभा आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूस समुद्राचे खारे पाणी असून सुद्धा या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. २२ एकर परिसरात व २२ बुरुज असलेला हा महाकाय किल्ला पर्यटकांना मोठा आकर्षण ठरला आहे. येथे येणाºया पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळाला असून लाखो रूपयांची उलाढाल झाली आहे.या किल्ल्यास दरवर्षी पर्यटक लाखोंच्या संख्येने भेट देत असतात. किल्ल्यात जाण्यासाठी जंजिरा पर्यटक सोसायटी या संस्थेस महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून परवाना देण्यात आला आहे. या संस्थेच्या १३ शिडांच्या बोटी असून यामधून पर्यटक ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे खोरा बंदरातून सुद्धा किल्यात ने-आण केली जात असते. दिघी बंदरातून सुद्धा जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना आणले जाते.जंजिरा पर्यटक सोसायटीच्या व्यस्थपकानी सांगितले की, जंजिरा किल्ल्यावर ये-जा करण्यासाठी ६१ रुपये तिकीट आकारले जाते. पर्यटकांची संख्या वाढली तर आम्ही जादा बोटींची संख्या उपलब्ध करून देतो; कारण किल्ला पहाण्यास विलंब होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न जास्त असतात. हा किल्ला पहाण्यासाठी जे पर्यटक राजपूरी जेट्टीवर धडकतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.या जेट्टीवर नारळ पाणी, सरबत,विविध टोप्या ,गॉगल्स ,अश्या विविध दुकाना मधून स्थानिकांना लाखो रुपयांचा धंदा होत आहे. तर लाखोंच्या संख्येने पर्यटक आल्याने महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डास लेवी च्या रूपात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर पुरातत्व खात्याने तिकीट आकारणी सुरु केल्याने त्यांना सुद्धा मोठे उत्पन्न मिळत आहे.पूर्वजांच्या महान आणि अप्रतिम वास्तुमुळे मुरुड तालुक्याला मोठे महत्व प्राप्त झाले असून दरवर्षी पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात वाढत असून सलग सुट्यात तर पर्यटकांच्या गाड्यांची मोठी रेलचेल दिसून येते.
वर्षभरात जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:31 PM