पाहुण्या पक्ष्यांचे रसायनीत आगमन
By admin | Published: October 8, 2015 11:31 PM2015-10-08T23:31:32+5:302015-10-08T23:31:32+5:30
परतीच्या पावसाला सुरुवात होत असतानाच जिल्ह्यात निसर्गरम्य परिसरात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. काही दिवसातच हिवाळा सुरू होणार आहे याचीच चाहूल हे
मोहोपाडा : परतीच्या पावसाला सुरुवात होत असतानाच जिल्ह्यात निसर्गरम्य परिसरात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे.
काही दिवसातच हिवाळा सुरू होणार आहे याचीच चाहूल हे स्थलांतरित पक्षी आपणास देत असतात, असे अभ्यासपूर्ण मत रसायनी येथील निसर्गयात्री असोसिएशनचे सल्लागार व पक्षीनिरीक्षक, पक्षीमित्र अनिल दाभाडे यांनी व्यक्त केले. साधारणपणे दरवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात हे वेगवेगळे स्थलांतरित पक्षी दाखल होवू लागतात. या स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांचे आॅक्टोबर ते मार्चच्या मध्यान्हापर्यंत वास्तव्य असते.
अनिल दाभाडे म्हणाले की, या स्थलांतरित पक्ष्यांच्या मूळ प्रदेशात अतिशय थंडी पडल्यामुळे त्यांना तेथे खाद्य उपलब्ध होत नाही. म्हणून हे पक्षी खाद्याच्या शोधासाठी इतर भागात स्थलांतर करतात. हे पक्षी त्या त्या भागात तीन-चार महिने वास्तव करतात. यानंतर त्यांना उन्हाची चाहूल लागताच ते मायदेशी परततात.
दाभाडे यांनी यावर्षी रसायनी व आसपासच्या परिसरात केलेल्या पक्षीनिरीक्षणात त्यांना ‘महाराष्ट्राचे राज्यपक्षी’ म्हणून गौरविलेले हरियाल (ग्रीन पिजन), हळद्या (गोल्डन ओरायल), खंड्या (किंगफिशर), राखीवटवंट्या (बार्बलर), शिंपी (टेलरवर्ड) मोठे सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, निदसुराय, तांबट, धनेश, तुतवार, धोबी, वेडा राघू व रानबदके आदी पक्षी आल्याचे निरीक्षणातून दिसून आले. (वार्ताहर)