नेरळ-माथेरान मिनीट्रेन प्रवास होणार प्रेक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:12 AM2018-09-02T03:12:21+5:302018-09-02T03:12:30+5:30

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे. मिनीट्रेनचे प्रवासी डब्यांवर आकर्षक चित्र काढण्यात आली आहेत.

Visiting the Neral-Matheran Minitrain will be spectacular | नेरळ-माथेरान मिनीट्रेन प्रवास होणार प्रेक्षणीय

नेरळ-माथेरान मिनीट्रेन प्रवास होणार प्रेक्षणीय

googlenewsNext

- विजय मांडे

कर्जत : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे. मिनीट्रेनचे प्रवासी डब्यांवर आकर्षक चित्र काढण्यात आली आहेत. पक्षी, प्राणी, माथेरान घाट यांची चित्रे रेखाटलेले प्रवासी डबे लवकरच मिनीट्रेनला लागणार आहेत. याशिवाय आणखी दोन नवीन इंजिने देखील रेल्वे कार्यशाळेत तयार होत आहेत.
शतक महोत्सव साजरा केलेली २१ किलोमीटर अंतर घाटमार्गाने पार करणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन जागतिक हेरिटेजच्या नामांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार असल्याने मिनीट्रेनचा प्रवास अधिक आकर्षक करण्यावर मध्य रेल्वे लक्ष देत आहे. २०१७ मध्ये रेल्वेकडून एनडीएम१ श्रेणीतील तीन नवीन इंजिने मिनीट्रेनच्या ताफ्यात आली आहेत. आता त्यात आणखी भर पडणार असून त्याच श्रेणीमधील आणखी दोन इंजिने नेरळ-माथेरान मिनीट्रेनसाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत तयार होत आहेत. त्यानंतर पर्यटकांना २०० हून अधिक नागमोडी वळणे बसल्या जागेवरून दिसावीत, यासाठी पारदर्शक प्रवासी डबे बनविले जात असून आल्हाददायक प्रवासासाठी उच्च श्रेणीच्या पर्यटकांना वातानुकूलित प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याची तयारी देखील मध्य रेल्वेकडून सुरू आहे.
मिनीट्रेनमधून द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणारे पर्यटक यांचा प्रवास आकर्षक होण्यासाठी मिनीट्रेनच्या प्रवासी डब्यांना नवीन लूक दिला जात आहे. माथेरानच्या जंगलाचा हिरव्या रंगात नवीन डबे रंगवले जात असून पक्षी, प्राणी, नद्यांची चित्रे डब्यांवर साकारली जात आहेत. नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील वेडीवाकडी वळणे ही देखील त्या द्वितीय श्रेणीच्या प्रवासी डब्यांवर दिसू लागली आहेत. असे आकर्षक आणि पूर्णपणे नवीन १२ डबे मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी येथील कार्यशाळेत बनविली जात आहेत. त्यातील दोन डबे नेरळ लोकोच्या मार्गावर आहेत. कुर्डुवाडी येथून निघालेले ते दोन प्रवासी डबे शनिवारी कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील नेरळ पेट्रोल पंप येथे पोहचले आहेत. अन्य डबे दिवाळीपूर्वी नेरळला पोहचतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

नेरळ-माथेरान-नेरळ ही टॉयट्रेन जगभरातील पर्यटकांचे आकर्षक आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत प्रवाशी डबे आकर्षक बनविले जात आहेत.
- ए. ए. सिंग,
जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे

Web Title: Visiting the Neral-Matheran Minitrain will be spectacular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड