अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये पर्यटक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:35 AM2018-11-08T03:35:23+5:302018-11-08T03:36:08+5:30
दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत.
अलिबाग - दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे हॉटेल्स, रेस्टारंट, कॉटेजेसही चांगलीच फुलून गेल्याचे दिसून येते. पावसाच्या मोसमात थंडावलेल्या पर्यटन व्यवसायाला त्यानिमित्ताने पुन्हा लकाकी आल्याचे पर्यटकांच्या संख्येवरून अधोरेखित होते.
रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनाचा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्र पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांसाठी खुले असणे आणि मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने जिल्ह्यात पर्यटकांचा तसा वर्षभर राबता असतो. पावसाच्या हंगामामध्ये फारसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा जोर धरत नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यस्थेचे गणित काही प्रमाणात कोलमडून पडते. पावसाळ्यामध्ये वर्षासहलीचा बेत आखलेला असतो. मात्र, यंदाच्या पावासाळी हंगामात रस्त्यांची पुन्हा एकदा दैना उडाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचे टाळले होते. आता पावसाळा संपल्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीची काही प्रमाणात कामे झाली आहेत, तर काही कामे प्रस्तावित आहेत.
पावसाळा संपल्यावर दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम हा पर्यटन व्यवसायाचा पहिला आणि तितकाच महत्त्वाचा हंगाम आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांनी पसंती दिल्याने या ठिकाणी त्यांचा राबता दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की लगेच शाळा, महाविद्यालय यांच्या सहली मोठ्या संख्येने दाखल होतात.
अलिबाग हे मुंबई पुण्यापासून जवळ असणारे शहर आहे. मुंबईमधील पर्यटकांना येथे पोहोचण्यासाठी सागरीमार्ग हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे रस्त्यावरील चार तासांचा प्रवास टाळून पर्यटक बोटीनेच येथे येण्याला सर्वाधिक पसंती देतात. अलिबागहून पुढे काशिद, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात पोहोचता येत असल्याने अलिबागचे पर्यटन आटोपून पर्यटक पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज होतात. समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. हे चित्र पुढचा आठवडाभर असणार आहे.
पर्यटनाला फायदा
तालुक्यात शुक्रवारनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाच्या हंगामातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यांची वाट बघत बसावे लागते. आता सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला फायदा होणार असल्याचे येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.