या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:57 PM2019-07-12T22:57:02+5:302019-07-12T22:57:09+5:30
जिल्ह्यातील २२८ विठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी : वरसोली, साजगाव प्राचीन मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी
अलिबाग : आषाढी एकादशी निमित्ताने जिल्ह्यातील सुमारे २२८ विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठूनामाचा गजर झाला. माउलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात मंदिराबाहेर गर्दी केली होती. भक्तिमय आणि उत्साहात आषाढी एकादशी सादरी करण्यात आली. अलिबाग-वरसोली आणि खोपोली-साजगाव ही प्राचीन मंदिर असल्याने या ठिकाणी भक्तांची गर्दी होती.
आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरामध्ये शुक्रवारी पहाटेपासूनच धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन असलेल्या आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरातही पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध भजनी मंडळांनी आपापल्या अविट भजनांनी वातावरण मंत्रमुग्ध करून सोडले होते. माउलीच्या भजनामध्ये भक्त चांगलेच तल्लीन झाले होते.
अलिबाग तालुक्यातील विविध कोळीवाड्यांतील दिंड्या माउलीच्या दर्शनाकरिता वरसोली येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आल्या होत्या. मंदिर परिसरामध्ये पावसापासून संरक्षण करण्याकरिता तात्पुरत्या शेडची उभारणी करण्यात आली होती. व्यवस्थापन समितीने भक्तांच्या प्रसादाचीही व्यवस्था केली होती. दिवसभर मंदिरांसमोर भाविकांनी लांबच लांब रांगा लावून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.
विठ्ठल-रखुमाईला तुळस प्रिय असल्याने ठिकठिकाणच्या मंदिराबाहेर तुळशीच्या माळा विक्रीची दुकान थाटण्यात आली होती. काही मंदिरांमध्ये भजनासह कीर्तनाच्या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील साजगावचे विठ्ठल मंदिर आणि अलिबाग येथील वरसोलीचे विठ्ठल मंदिर ही दोन्ही मंदिरे आंग्रेकालीन मंदिर आहेत. त्यामुळे या मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.
पंढरपूरसाठी विशेष बस
रायगड जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाता यावे, यासाठी रायगड जिल्ह्यातील आगारातून १५ एसटीच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या. परतीसाठी दहा जादा गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे एसटी महामंडळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. रायगडमधून २५ जादा गाड्याही पुणे आगाराकडे पाठविण्यात आल्याने भाविकांची चांगलीच सोय झाली.
अलिबाग : पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येआषाढी एकादशीनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. पीएनपी वेश्वी संकुलामधील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, होली चाइल्ड आणि जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पालखी सोहळ्यात विठूनामाचा गजर घुमला. याच निमित्ताने वनसंवर्धन, झाडे लावा, झाडे जगवा असे जनजागृतीचे संदेश दिला. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या.
आगरदांडा : मुरुड -जुनी पेठ येथील प्रतिपंढरपूर अशी ओळख असणारी श्री भैरव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईची पूजा करण्याकरिता भाविकांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती. मुरुड -जुनी पेठ येथील प्रतिपंढरपूर ओळख असणारी श्री भैरव विठ्ठल-रखुमाई मंदिरात सकाळी विठ्ठल-रखुमाईमातेच्या पूजेला सुरुवात झाली. दुग्धाभिषेक आणि विविध लेप लावून विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला स्नान घालण्यात आले. खास अलंकृत दागिने आणि वस्त्र घालून विठ्ठल-रखुमाईची पूजा संपन्न झाली. या पूजेचा मान-दीपक राजपूरकर व त्यांच्या पत्नी दीपश्री राजपूरकर यांना मिळाला. पहाटे काकड आरती व महापूजा आरती झाल्यानंतर मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. पंचक्रोशी भागातील एकमेव मंदिर असल्यामुळे विठ्ठलाच्या ओढीने टाळ-मृदंगाच्या तालावर विठूरायाचा जयघोष करत विठ्ठलाच्या चरणी भाविक नतमस्तक झाले. मंदिरात भक्तीचे वातावरण पसरले होते.
वावोशी : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाºया खालापूर तालुक्यातील ताकई येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकदशीनिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. या वेळी झालेल्या महापूजेचा मान खोपोलीतील अॅड. सचिन पाटील यांना मिळाला. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खालापूर तालुक्यातील ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या सोहळ्यात महापूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यावर्षी हा महापूजेचा मान खोपोलीतील नामवंत वकील अॅड. सचिन पाटील यांना मिळाला. आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे ४ वाजता विठूरायाची महापूजा झाली. भाविकांनी मंदिराबाहेर रांग लावली होती. खोपोली नगरपालिकेच्या वतीने मंदिरासमोर भव्य सभामंडप उभारल्यामुळे पावसापासून भाविकांना दिलासा मिळाला.अनुचित घटना घडून नये यासाठी पोलीस तैनात होते.
ंंकर्जत : तालुक्यात सुमारे ५० गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या बहुसंख्य गावातील ग्रामस्थ पंढरपूर, आळंदीला जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. काही शाळांमधील चिमुरडे संतांची वेशभूषा करून ताल धरत कपालेश्वर मंदिरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आले आणि त्यांनी हरिनामाचा गजर केला. कर्जत शहरातील विठ्ठल मंदिरातील पूजेचा मान नगरसेविका मधुरा चंदन आणि महेंद्र चंदन या उभयतांना मिळाला.
मोहोपाडा : राजिप शाळा रीस येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पालखीमधून विठ्ठल-रखुमाईची दिंडी टाळ मृदुंगाच्या घोषात संपूर्ण गावात फिरली. या वेळी गावातील माता-भगिनींनी अत्यंत भक्तिभावाने आपल्या दारी विठूमाउलीचे आगमन झाले असे समजून आलेल्या दिंडीचे पूजन केले. पालखी उचलणाºया मुलांचे पाय धुऊन भक्तिभावाने त्यांना ओवाळले. याप्रसंगी फुगड्या, झिम्मा खेळ खेळून गोल रिंगण सोहळाही पार पाडला. मोहोपाडा येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी विठूनामाचा गजर करीत पायी वारी काढली.
विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी
कर्जत : कर्जत शहरातील शिशुमंदिर व शारदा मंदिर शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी प्रतिवर्षाप्रमाणे कर्जत शहरात वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. वारकरी दिंडीमुळे शहारात प्रसन्नदायी व भक्तिमय वातावरण झाल्याने जणू आपण पंढरपुरातच आहोत, असा कर्जतकरांना साक्षात्कार होऊन विठूमाउलीचे दर्शन झाल्याने अत्यानंद झाला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी काढलेल्या या म्दिंडी सोहळ्यात प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाई अवतरल्याचा भास होत होता. विद्यार्थी-विद्यार्थिनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशात होते. छोटे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात असल्याने शहरातून पंढरीची वारी जात असल्याचा भास होत होता.