कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:40 AM2020-02-19T03:40:25+5:302020-02-19T03:40:44+5:30

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी सरपंच, नगरसेवक, माजी नगरसेवक

Vivek Patil, 2 accused in Karnala Bank scam | कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर गुन्हे

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर गुन्हे

Next

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणालाही अटक न केल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्नाळा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळा प्रकरण राज्यभर गाजत होते. बँकेचे लाखो ठेवीदार ठेवी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत होते. भाजपचे आमदार महेश बालदी व प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी कर्नाळा बँकेविरोधात मोठे आंदोलन पुकारण्यात आले होते.

कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याचा कर्ज प्रकरणात वापर करून बँकेचे सभासद, ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार २८६ रुपयांचा अपहार केला. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली. म्हणून सहकारी संस्था अलिबाग येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ चे उमेश गोपीनाथ तुपे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ७६ जणांविरोधात १७ फेब्रुवारी रोजी रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी सरपंच, नगरसेवक, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांचा समावेश आहे. तसेच काही जण भाजपचे आहेत.
६३ खाती बोगस बँकेत ६३ खाती बोगस आढळली आहेत. अनेकांना बोगस, कागदपत्रांअभावी कर्जे दिलेली आहेत. विविध ठिकाणी रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली असून ५१२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था वर्ग १ उमेश तुपे यांनी दिली. मे २०१९ मध्ये तपासणी सुरू केली. त्यानुसार सहकार आयुक्तांना रिपोर्ट दिले. २४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अखेर १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Vivek Patil, 2 accused in Karnala Bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.