मावळमध्ये "वोट भी दो,नोट भी दो" बसपाची भुमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:46 PM2024-05-11T17:46:34+5:302024-05-11T17:47:45+5:30

वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या मुद्द्यावर  मराठा समाजाला समर्थन देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वंचितची भुमिका पटली नसल्याने राजाराम पाटील यांनी बहुजन समाज पार्टीचा पर्याय निवडला आहे.

"Vote Bhi Do, Note Bhi Do" role of BSP in Maval | मावळमध्ये "वोट भी दो,नोट भी दो" बसपाची भुमिका

मावळमध्ये "वोट भी दो,नोट भी दो" बसपाची भुमिका

मधुकर ठाकूर  

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे राजाराम पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत.२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली होती.७६ हजार मते मिळवून पाटील तिसऱ्या स्थानावर होते.या निवडणुकीत मात्र वंचितची साथ सोडून "वोट भी दो,नोट भी दो"चार नारा देत देशासमोर असलेला बसपाचा तिसऱा पर्याय मतदारांनी निवडावा असे आवाहन राजाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.  

वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या मुद्द्यावर  मराठा समाजाला समर्थन देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वंचितची भुमिका पटली नसल्याने राजाराम पाटील यांनी बहुजन समाज पार्टीचा पर्याय निवडला आहे. बसपानेही मावळ लोकसभेची उमेदवारी देऊन  निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.व्यवसायाने शिक्षक, शेतकरी, मच्छीमार असलेल्या पाटील यांनी अनेक लढ्यात सहभागी होऊन संघर्ष केला आहे. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याच्या कामाची आणि मागील लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते याची दखल घेऊनच बहुजन समाज पार्टीने राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

मुंबई, कोकणातील भुमीपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाला उध्वस्त करण्याचे काम शिवसेने पाठोपाठ भाजपने केले आहे.नवी मुंबई, पनवेल, उरण येथील सुमारे ४५ हजार एकर शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने संपादन केल्या आहेत.जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांना हजारो नोकऱ्या, रोजगार देण्याची वारेमाप आश्वासने दिली होती.मात्र रिलायन्सच्या महामुंबई सेझसाठी दिलेल्या जागेत अद्यापही कोणत्याही प्रकल्पाची वीटही लावण्यात आलेली नाही.मुदतीत प्रकल्प उभारण्यात आलेला नसल्याने प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची गरज असताना मात्र बड्या भांडवलदारांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पायघड्या घातल्या आहेत.   देशातील जनतेने कॉग्रेसची ५० वर्षांची आणि मागील दहा वर्षांपासून भाजपची राजवट अनुभवली आहे. भाजपने आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट अदाणीच्या घशात घातला आहे.केंद्र सरकारच्या मालकीचे नफ्यात चालणारे अनेक प्रकल्प विकून टाकले आहेत. किंवा खाजगीकरण केले आहे.त्यामुळे चाय बेचनेवाला अभी देश बेच रहा है ! अशी टीका करतानाच संसदेत नोटबंदी विरोधात प्रश्न करणाऱ्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.देशातील जनतेला मंदिरे नकोत तर आरोग्य मंदिरांची आवश्यकता आहे.मात्र देशाची मानसिकता मंदिराकडे आहे.ही मानसिकता धोकादायक आहे.

केंद्र, राज्य सरकारने २२ हजार कोटी खर्चून देशातील सर्वात मोठा सागरी सेतू उभारला आहे.सागरी सेतू उभारताना हजारो मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे.त्यामुळे २०१३ च्या कायद्यानुसार मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाच्या ५० टक्के म्हणजेच ११ हजार कोटी रुपये खर्च करण्याची आवश्यकता होती.मात्र केंद्र व राज्य सरकारने प्रकल्प बाधीत मच्छीमारांना फक्त २५-५० लाख आर्थिक नुकसान देऊन मच्छीमारांची फसवणूक केली आहे.ही फसवणुक माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केली आहे हे विशेष.मुंबईत अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या जागा होत्या.त्या आरमाराच्या जागेच्या  ठिकाणी  केंद्र व राज्य सरकारने गटारे बांधली आहेत.केंद्र व राज्य सरकारला २०१३ चार कायदाच कळलेला नसल्याचा आरोपही बसपाने पत्रकार परिषदेतून केला आहे.

मुंबई,कोकणातील शेकडो हेक्टर गुरचरणाच्या जागेवर मागासवर्गीयांची घरे होती.मागासवर्गीयांची घरे तोडून गुरचरणाच्या जागा पंतप्रधान आवास योजनेसाठी देण्यात आल्या आहेत.पंतप्रधान आवास योजना गरीब,गरजुंसाठी राबविण्याची गरज असताना मात्र या योजनेचा लाभ ब्राह्मण,छत्रीय, वैश्य ( ईडब्ल्युएस ) यांच्यासाठी होऊ लागला आहे.ब्राह्मण,छत्रीय, वैश्य यांच्याकडे याआधीच वाडे,बंगले आहेत.मात्र मुंबई, पुण्यात ही योजना गोरगरिबांसाठी न राबविता बिल्डरांनी या योजनेच्या नावाखाली गडगंज पैसा कमावला आहे.त्यांना सत्ताधारीही पाठीशी घालत आहेत.त्यामुळे ही योजना मागासवर्गीयांसाठी खुली करण्याची गरज निर्माण झाली आहे.मुंबई, कोकणात ओबीसींना हक्काची जागा,घरे मिळाली पाहिजेत. मुंबई, नवीमुंबई,उरण पनवेल मधील कोळीवाडे, मच्छीमारांच्या जागांना अद्यापही प्रापर्टी कार्ड,मालकी हक्क नाही.त्यामुळे अशा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना कर्ज मिळत नाही.

ओबीसी, एससी,एसटी समाजातील लोकांच्या न्याय  हक्कासाठी बसपाच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहोत.सिडको, जेएनपीए, एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या कवडीमोल भावाने जमिनी घेऊन मोठ्या भावाने विक्री करीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.मावळ मतदारसंघ अरबी समुद्राला व विविध डोंगराला जोडणारा आहे.या मावळ मतदारसंघातील श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे-पाटील या दोघांनाही समुद्रातील काय कळतंय असा सवालही राजाराम पाटील यांनी केला आहे. निवडणूक लढविण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत.त्यामुळे नागरिक, मतदारांकडून मिळणाऱ्या एक रुपयाच्या लोकवर्गणीतून आपण निवडणूक लढवित आहोत. लोकवर्गणीला लोकशाहीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे गरीबांचा उमेदवार म्हणून "वोट भी दो,नोट भी दो"चा नारा देत देशासमोर असलेला बसपाचा तिसऱा पर्याय मतदार नक्कीच निवडतील   असा दावा राजाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे.

Web Title: "Vote Bhi Do, Note Bhi Do" role of BSP in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.