वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:10 AM2018-08-13T04:10:14+5:302018-08-13T04:10:30+5:30
विविध रिअॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे.
-आविष्कार देसाई
अलिबाग : विविध रिअॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. आॅनलाइन मते मिळवण्यात नाशिक जिल्हा ३० हजार मते मिळवून सर्वात पुढे आहे, तर रायगड जिल्हा १२ हजार मते घेऊन आठव्या स्थानावर आहे, ही आकडेवारी शुक्रवारपर्यंतची आहे.
१ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत तुम्हाला तुमचे मत द्यायचे आहे, यासाठी ‘एसएसजी १८’ हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वेक्षणात भारतातील सर्व जिल्ह्यांचे प्रामुख्याने तीन मानकांच्या आधारे जिल्ह्यातील व गावातील स्वच्छता व स्वच्छतेशी निगडित कामांची गुणवत्ता, संख्याबळ लक्षात घेऊन स्वतंत्र संस्थेमार्फत रँकिंग ठरवण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाद्वारे निश्चित होणारे गुणांकन हे एकत्रित मानकांच्या आधारे जिल्ह्यातील काही गावांतील सार्वजनिक ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणची निरीक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेची समज आणि मते घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार यासाठी घेण्यात येणार आहे. या सर्व्हेचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांची आणि राज्याची स्वच्छतेमधील स्थानासह क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रम
ग्रामपंचायत आणि सर्व सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य ठेवणे
वैयक्तिक शौचालयाचा वापर आणि फोटो अपलोडिंग १०० टक्के करणे
नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करून त्याचा वापर करणे
शौचालयाच्या स्थितीबाबतचा रेकॉर्ड ठेवणे
स्वच्छग्राही यांनी सक्रिय सहभाग घेणे
निगराणी समिती गठीत करून ती सक्रिय करणे
सांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणे
उपक्रमांची विविध मार्गाने जनजागृती करणे
‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’
प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड सर्वेक्षणासाठी नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे. ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाइन सहभाग घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट २०१८ कालावधीत होणार आहे.
असे असेल स्वच्छ सर्वेक्षण
केंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.
गावातील विविध लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. एसएसजी १८ या अॅपवरील मतेही प्रामुख्याने विचारात घेतली जाणार आहेत.
एका क्रमांकासाठी एकच मत
एसएसजी १८ हे अॅप डाउनलोड केल्यावर एका मोबाइल क्रमांकाच्या व्यक्तीला एकदाच मत देता येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मते नोंदवून जिल्ह्याला पहिल्यास्थानी आणावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.