अलिबाग : रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी अलिबाग बीच येथून अलिबाग शहरात वॉकेथॉन रॅली काढण्यात आली. ‘व्होट कर रायगडकर, चला मतदान करू या; लोकशाही मजबूत करू या’, ‘आपका व्होट, आपकी ताकद’, ‘एकच लक्ष्य मताचा हक्क’, ‘मतदार राजा जागा हो... लोकशाहीचा धागा हो’ अशा विविध घोषवाक्यांनी अलिबाग शहर दुमदुमून गेले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून या वॉकेथॉन रॅलीला अलिबाग बीच येथूनसुरुवात झाली.
शानिवारी सकाळी ७.३० वाजता अलिबाग बीच येथून सुरुवात होऊन रायगड जिल्हा परिषद, अलिबाग अर्बन बँक को. लि., स्टेट बँक आॅफ इंडिया, अरु ण कुमार वैद्य, जा. र. ह. कन्याशाळा, युनियन बँक, नगररचना कार्यालय, बस स्टॅण्ड, रेवदंडा नाका, शेतकरी भवन, ठिकरुळ नाका, शिवाजी पुतळा, जामा मशिद, चावडी मोहल्ला, पोस्ट आॅफिस, अलिबाग बीच येथे रॅलीची सांगता झाली. अलिबाग बीच येथे उभारण्यात आलेल्या आकर्षक रेल्फी कॉर्नरला छायाचित्र काढण्याचा नागरिकांनी आनंद घेतला. जे. एस. एम. कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत पथनाट्य सादर केले. तसेच अलिबाग बीच येथे मतदान यंत्राचे वाळुशिल्प साकारण्यात आले होते.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा निवडणूक अधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, स्वीप नोडल अधिकारी सुनील जाधव, सहायक निवडणूक अधिकारी सचिन शेजाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या वॉकेथॉन रॅलीमध्ये विविध संघटना, सरकारी अधिकारी, कर्मचारी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.