कडेकोट बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना; सात ट्रकने वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:03 AM2019-04-25T00:03:56+5:302019-04-25T00:04:15+5:30
पोलीस व महसूल प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन
- संतोष सापते
श्रीवर्धन : श्रीवर्धन मतदारसंघातील सर्व मतदान यंत्रे म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल येथे रात्री ११.३० वाजेपर्यंत जमा करण्यात आली. एसटी प्रशासनाच्या ४६ बसेसने प्रत्येक मतदान बूथवरून मतदान यंत्रांचे संकलन केले. बुधवारी सकाळी ९.३० वा. चोख पोलीस बंदोबस्तात सर्व मतदान यंत्रे अलिबागकडे रवाना करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून दोन अधिकारी व आठ शस्त्रधारी कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात केले होते. म्हसळा, माणगाव, वडखळ मार्गे अलिबाग येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह मार्गक्र मण करण्यात आले. मतदान यंत्रे ठेवलेल्या सात ट्रकला उपविभागीय पोलीस अधीक्षक बाबुराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, सहा. पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत एसटीने निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाºयांना त्यांच्या प्रभागात सोडण्याचे काम यशस्वीपणे पार पडले. श्रीवर्धन मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कुठेही गैरप्रकार होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती. सर्व विभागातील कर्मचाºयांनी मतदान प्रक्रिया सुरळीत व यशस्वी करण्यासाठी चांगले सहकार्य केले, असे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले.
मतदान यंत्रांसाठी कडेकोट चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था याचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. मतदान पेट्या सुरक्षितपणे अलिबागला पोहोचवण्याचे दायित्व आमचे आहे, त्यासाठी कुठेही दुर्लक्ष केले जाणार नाही.
- धर्मराज सोनके, सहायक पोलीस निरीक्षक, बोर्लीपंचतन
निवडणूक मतदान यंत्रे वाहतुकीचे नियोजन एसटी प्रशासनाने व्यवस्थितपणे पार पाडले आहे. त्यासाठी ४६ बसेस महामंडळाने निवडणूक यंत्रणेस दिल्या होत्या, त्यानुसार सर्व कर्मचाºयांनी शिस्तबद्ध काम करून हे वाहतूक नियोजन यशस्वी पार पाडले आहे.
- रेश्मा गाडेकर, आगारप्रमुख, श्रीवर्धन
पेण विधानसभा मतदारसंघातील ३७५ मतदान संयंत्रे अलिबागकडे रवाना
पेण : पेण विधानसभा मतदारसंघातील ३७५ मतदान केंद्रांवरील मतदान संयंत्रे बुधवारी सकाळी ८.३० वाजता अलिबाग येथील ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रायगड जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यासाठी नेण्यात आली आहेत.
पेण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या उपस्थितीत पेणचे विभागीय पोलीस अधिकारी सुनील जाधव, पेण पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, वडखळ पोलीस निरीक्षक शिंदे आदी सर्व अधिकारी वर्गासहित पोलीस बंदोबस्तात ३७५ मतदान संयंत्र पेण प्रांत कार्यालय शेजारच्या कोएसो प्रशालेच्या मौदानावरून सकाळी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह अलिबाग येथे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी नेण्यात आल्या आहेत.
मतदान संपताक्षणी मंगळवार, २३ एप्रिलला रात्रभर पेण, पाली, रोहे येथून ही मतदान संयंत्रे पेण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सतर्क राहून काम करीत होती.
सर्व मतदान संयंत्र जमा झाल्यानंतर ती बुधवारी सकाळी ८.३० वाजता कंटेनरमध्ये भरून पोलीस बंदोबस्तात अलिबागकडे रवाना झाली.