मजुरी तर परवडेनाच; खते, बियाणेही खिसा करताहेत रिकामा
By निखिल म्हात्रे | Published: June 7, 2024 10:33 AM2024-06-07T10:33:46+5:302024-06-07T10:34:08+5:30
रायगडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या रागडमध्ये भात शेतीचे क्षेत्र घटले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. गेल्यावर्षी चांगला उतारा मिळाल्याने थोडी खुशी या शेतकऱ्यांमध्ये आहे; मात्र वाढलेल्या मजुरीमुळे भात शेती करायची की नाही, या विवंचनेत ते आहेत.
खरीप हंगामासाठी आता भातशेतीची तयारी शेतकरी करीत आहेत. बी-बियाणांची जमवाजमव सुरू आहे; मात्र खतांसह बी-बियाणांच्या दरातही दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मेहनत करून पदरात काय पडेल, अशा भावना ते व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करीत भात उत्पादक शेतकरी शेती करीत आहेत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजुरीचे खर्चही वाढलेले आहे. आता नांगरणीही बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने करतात; मात्र डिझेलचे दर वाढल्याने नागंरणीचे दरही वाढले आहेत. खते, बियाणे, औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.
नवनवीन प्रयोगांचा अवलंब
येथील भात उत्पादक शेतकरी नवनवीन प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहेत.
स्वस्त खते उपलब्ध होत नसल्याने संशोधित व संकरित भात बियाणांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना महाग खतांची खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा वापर कमी करून मिश्र खत व संयुक्त खताचा वापर करावा. जेणेकरून उत्पन्न जास्त येईल. - सुभाष पाटील, कृषितज्ज्ञ.
अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याने ही महागडी खते घ्यावीच लागतात. शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत राहावी, यासाठी शेती करीत आहे. - संदीप कदम, प्रगतिशील शेतकरी.