विशेष रेल्वेला प्रथमच थांबा
By Admin | Published: September 4, 2016 03:26 AM2016-09-04T03:26:43+5:302016-09-04T03:26:43+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्याहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे पहिल्यांदाच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही गाड्या कर्जत स्थानकात
कर्जत : मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्याहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे पहिल्यांदाच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही गाड्या कर्जत स्थानकात थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोकणात जाणारी गाडी कर्जत स्थानकात पहिल्यांदाच थांबल्याने कर्जत रेल्वे प्रवासी संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुढेही प्रत्येक गाडी कर्जतमध्ये थांबविण्यात यावी, अशी मागणी रेल्वेकडे केली आहे. पहिल्यांदाच थांबलेल्या गाडीच्या चालकाचा व सह-चालकाचा सत्कार करून कर्जतकरांनी गाडीचे स्वागत केले.
विशेष म्हणजे ही गाडी येणार आहे की नाही याची माहिती कर्जत रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना नव्हती. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना याबाबत माहिती दिली. ‘कोकणातील गाड्यांचा कर्जतला थांबा’ ही बातमी सोमवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे प्रवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
कोकणात जाणारी गाडी पहिल्यांदाच कर्जत स्थानकात थांबणार असल्याने प्रवासी संघटनेचे पंकज मांगीलाल ओसवाल, माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर, काँग्रेस शहराध्यक्ष पुंडलिक भोईर आदी कर्जत स्थानकात आले. त्यांनी ०१४३१ पुणे-झारप गाडी कधी येणार? याबाबत विचारणा केली असता, स्थानक व्यवस्थापकांना कल्पनाच नव्हती. त्यानंतर ओसवाल यांनी डीएमओ (डिव्हिजनल ओपरेशनल मॅनेजर) गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही सुरुवातीला पुणे-झारप गाडीला कर्जतमध्ये थांबा नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानक व्यवस्थापकांनी खात्री केल्यावर गाडीची सविस्तर उद्घोषणा केली व प्रवाशांना तिकीटवाटप केले. (वार्ताहर)