शेतकऱ्याला प्रतीक्षा सिंचनाच्या पाण्याची
By admin | Published: November 27, 2015 02:16 AM2015-11-27T02:16:55+5:302015-11-27T02:16:55+5:30
खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात.
पेण : खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात. रब्बी हंगाम शंभर टक्के पीक देणारा फायदेशीर हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेण्याची अधिक ओढ असते. या वर्षीचा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने रब्बीची मशागत करणारा शेतकरी सिंचनाच्या पाणी प्रतीक्षेत आहे.
रब्बीत भातशेतीच्या बरोबरीने भाजीपाला, नगदी पिके, कडधान्य, कलिंगड व फूलशेती अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला लघुपाटबंधारे विभाग सिंचनाचे पाणी पाटात कधी सोडणार याची प्रतीक्षा आहे. पेणमधील हेटवणे सिंचन प्रकल्पाअंतर्गत २६८ हेक्टर क्षेत्रावर धरण परिसरात रब्बी हंगामात शेती केली जाते. हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा असल्याने उन्हाळी शेतीसाठी हेटवणे धरण प्रकल्प संस्था शेतीला पाणी सोडते मात्र पाणी कधी सोडले जाणार याची तारीख सिंचन विभागे निश्चित केली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
यावर्षी हेटवणे परिसरातील रब्बी हंगामाची तयारी म्हणून शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात या परिसरातील शेतकऱ्यांना हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा तीर कालव्यातून १४ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येते, मात्र हेटवणे जलसंधारण कालवा विभागाकडून शेतकऱ्यांना या वर्षीचे शेतीसाठी पाणी सोडण्याची तारीख आजपर्यंत सिंचन विभागाने जाहीर केली नाही. या परिसरातील शासनाचे स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांच्याकडेही शेतीसाठी पाणी सोडणार याबाबतची माहिती दिलेली नाही.
हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा आहे. सबंध कोकण विभागातील लघुपाटबंधारे व मध्यम प्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. सिंचनाचे पाणी शेतीला देण्यास काहीही अडचण नाही. मात्र जलसंधारण विभागाने सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळणार की नाही याबाबत सूचित केलेले नाही.