विजय मांडेकर्जत : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणाऱ्या पाच कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. आठ कोटी रुपये या कामांच्या निविदा नोव्हेंबर २०२० मध्ये मंजूर करण्यात आल्या आहेत. पावसाळा जवळ येऊ लागला आहे तरी रस्त्यांची कामे सुरू होत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत; मात्र संबंधित योजनेचे काम का सुरू केले जात नाही, याचा जाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला विचारावा, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जा उन्नती करण्यासाठी काही रस्त्यांची कामे ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित करण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील गावे जोडणाऱ्या सहा रस्त्यांची कामे मंजूर झाली होती आणि त्यापैकी पाच रस्त्यांच्या कामांना आठ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या राज्यमार्ग १०३ पासून बोर्ले - जिते - कुंभे या २.५९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अडीच कोटी तर प्रमुख जिल्हामार्ग चिंचवली - सालवड - नसरापूर या ३.२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८९ लाख, खांडपे-तिवणे-सांडशी या ४.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी पावणे तीन कोटी रुपये, जिल्हा हद्दीपासून बेडीसगाव या दोन किलोमीटर लांबीचा जोडरस्ता तयार करण्यासाठी ७१ लाख रुपये आणि कोषाणे-वावे या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी साडे तीन कोटी असा आठ कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या निविदा नोव्हेंबर २०२० मध्ये शासनाने ऑनलाइन पद्धतीने काढल्या होत्या. या निविदा २५ नोव्हेंबर रोजी मंजूर केल्यानंतर शासनाने ही सर्व कामे करण्यासाठी ४ जानेवारी २०२१ रोजी कार्यादेश संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती.
नवी मुंबई येथील सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीने कर्जत तालुक्यातील पाच कामांचा ठेका मिळविला आहे; मात्र अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केलेल्या रस्त्यांची अवस्था फार दयनीय आहे. त्यातील बोर्ले - जिते, सालवड - नसरापूर आणि सांडशी - खांडपे, कोषाणे - वावे या रस्त्यांवरून दुचाकी चालवणेदेखील कठीण होऊन बसले आहे.
जानेवारी महिन्यात या रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरणाची कामे सुरू झाली असती तर मे महिन्यापर्यंत उन्हाळ्यात ही कामे पूर्ण होऊन रस्ता नव्याने तयार झाला असता; मात्र ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना यावर्षीदेखील खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागणार आहे. आमच्या कंपनीला त्या कामांचा ठेका मिळाला आहे. काम लवकरच सुरू करणार आहोत, असे सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शनकडून सांगण्यात आले, तर या सर्व कामाबद्दल कोणतीही माहिती नाही, असे कार्यकारी अभियंता पी. पी. बनगोसावी यांनी सांगितले.
'आमच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यातून पायी चालणाऱ्या माणसाला चालता येत नाही, त्यामुळे आम्हाला आमची वाहनेदेखील चालवता येत नाहीत. दुसरीकडे गेली दहा वर्षे नेरळ रेल्वे स्थानकजवळ असलेल्या गावात रस्ता खड्ड्यात हरवला असल्याने येथील व्यवसाय ठप्प झाले आहेत.' - विजय घरत, ग्रामस्थ, जिते
आमच्या भागातील कामे असल्याने आम्ही काही चांगल्या ठेकेदारांना कामे मिळविण्यासाठी टेंडर भरले होते; मात्र या पाच रस्त्यांच्या कामांचा ठेका मिळविणाऱ्या ठेकेदार कंपनीने तब्बल १२ टक्के कमी दराने कामांचा ठेका मिळविला आहे. त्यांनी चांगल्या दर्जाची कामे करावीत, यासाठी त्या गावातील ग्रामस्थ त्या कामांवर लक्ष ठेवणार आहेत. शासनाने आधी त्या ठेकेदारावर कामे सुरू करण्यास उशीर झाल्याबद्दल कारवाई करावी आणि त्याच ठेकेदाराने दर्जेदार कामे करावीत, अशी आमची मागणी आहे. - सुधाकर घारे, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद
'मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमच्या गावात येणारा रस्ता मंजूर झाल्याने आम्हा ग्रामस्थांना हायसे वाटले होते. या योजनेतून होणारे रस्ते चांगले दर्जाचे काम करून केले जातात, त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे रस्त्याचे काम आम्ही कामे सुरू असताना उभे राहून करून घेणार आहोत.' - केतन बेलोसे, ग्रामस्थ, सांडशी
'कर्जत तालुक्यातील २०१९-२० च्या आराखड्यातील सहा रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामासाठी निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आले आहेत. ४ जानेवारी २०२१ रोजी कार्यादेश देण्यात आल्यानंतर रस्त्याची कामे सुरू झाली नसल्याने ठेकेदार कंपनीला पत्र पाठवून सूचित करण्यात आले आहे. त्यांनी सर्व कामे सुरू करावीत, असे आदेशदेखील निर्गमित करण्यात आले आहेत. - दिनेश परदेशी, उपअभियंता,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना