जंजिरा किल्ल्यावर जाण्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा; शिडाच्या बोटी खातात हेलकावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:03 PM2019-10-31T23:03:55+5:302019-10-31T23:04:13+5:30
पर्यटकांना उतरताना होतोय त्रास
गणेश चोडणेकर
आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्याने अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्या वेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचतात, त्याच वेळी प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बोटींच्या हेलकाव्यामुळे किल्ल्यात उतरणे फार मुश्कील होते. अशा वेळी उतरताना मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. २०१८ च्या एप्रिल महिन्यात नाशिक येथील पर्यटक महिलेने उडी मारल्यामुळे पायाचे हाड मोडण्याची घटना घडली होती; परंतु तरीसुद्धा तरंगती जेट्टी बनवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अडकून पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेट्टी बनवावी, अशी मागणी असूनसुद्धा ती पूर्ण होत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अलिबाग, मांडवा येथे असणाऱ्या तरंगत्या जेट्टीमुळे मुंबई येथून प्रवास करणे पर्यटकांना अगदी सोपे जात आहे. त्याचप्रमाणे जंजिरा किल्ल्यावरही जेट्टी बनवल्यास कोणताही अपघात होणार नसून पर्यटकांची सुरक्षा अधिक जपता येणार आहे. तरंगत्या जेट्टीचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याने स्वीकारून त्यास मंजुरीसुद्धा दिली आहे; परंतु मेरीटाइम बोर्ड या कामास सुरुवात न केल्यामुळे हा प्रस्ताव अजून कागदावरच आहे. निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु जेट्टी न झाल्याने लाखो पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जंजिरा किल्ल्यावर तरंगती जेट्टी बांधण्याची अनुमती पुरातत्त्व खात्याने दिलेली आहे. या जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे असून त्यांनी हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. कारण या कामासाठी निधीसुद्धा त्यांच्याकडे वर्ग झाला आहे, त्यांनी हे काम तातडीने सुरू करावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. सध्या या किल्ल्यावर जेट्टी नसल्याने पर्यटकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. - बजरंग येलकर, पुरातत्त्व अधिकारी, मुरुड