दासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिने बंद असलेले पर्यटनस्थळे, गड-किल्ले आणि धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. रायगड किल्ला, पाचाड व महाड शहरातील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून नाताळ आणि रविवार अशा सलग सुट्ट्या लागल्याने किल्ले रायगडावर पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे. यामुळे रायगड रोपवेला सुमारे चार ते पाच तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. स्थानिक लोकांचा रोजगाराचा प्रश्न मिटला आहे.
देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेले पाचाड व महाडचे चवदार तळे ही महत्त्वाची स्थळेही बंद करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी उठवण्यात आली आणि पर्यटकांनी कोरोनाची धास्ती घेतच पर्यटनस्थळे गाठली. गेली काही दिवस रायगड रोपवेही वादामुळे बंद ठेवण्यात आला होता. मात्र, काही दिवसापूर्वी रायगड रोपवे सुरू करण्यात आल्याने पुन्हा रायगडावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पाचाडपासून वाहनांच्या रांगा लागल्या असून, चित्तदरवाजा येथे वाहने पार्किंग करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड रोपवेला सुमारे चार तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे चित्त दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. किल्ल्यांवर गर्दी झाल्याने व्यावसायिक आनंदित झाले आहेत. व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.