इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: December 22, 2016 06:26 AM2016-12-22T06:26:45+5:302016-12-22T06:26:45+5:30
तालुक्यातील नांदवी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून सहा महिने झाले. तरीही अतिशय जीर्ण व भाड्याच्या इमारतीत
गिरीश गोरेगावकर / माणगाव
तालुक्यातील नांदवी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून सहा महिने झाले. तरीही अतिशय जीर्ण व भाड्याच्या इमारतीत सध्या रुग्णालय सुरू आहे. त्यामुळे रु ग्णांची गैरसोय होते. या इमारतीचे काम सुद्धा टप्प्याटप्प्याने झाले आहे. त्यामुळे उद्घाटन कधी होणार, या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.
रु ग्णांच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर असणारे आरोग्य खाते, तसेच ई-आरोग्याच्या वल्गना करणारे शासन नांदवी आरोग्य केंद्राच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसते. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याच गावातील आरोग्य केंद्राला गंभीर समस्यांनी ग्रासले आहे. २००० पासून स्थापन झालेले नांदवी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अद्यापपर्र्यंत भाड्याच्या जागेत चालवले जात आहे. अनेक पदे रिक्त आहेत. या केंद्राअंतर्गत १४ गावे, १९ वाड्या यांची एकूण नऊ हजार लोकसंख्या आहे. केंद्रातील ओपीडी सरासरी ४० ते ५० असते. अपूर्ण जागा, अपुरा कर्मचारी वर्ग अशा एक ना अनेक समस्यांनी या आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. नांदवी येथे महिलांसाठी प्रसूतीगृह नसल्याने
रु ग्णांचे प्रचंड हाल होतात. रुग्णाला प्रसूतीसाठी हरकोल उपकेंद्रात किंवा माणगाव येथे उपजिल्हा रु ग्णालयात हलवले जाते. नांदवी प्रा. आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असून एकच अधिकारी गेली कित्येक वर्षे रात्रं-दिवस रु ग्णसेवा देत आहेत. सद्य:स्थितीत मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे फार हाल होत आहेत.
नवीन इमारतीचे उद्घाटन अद्याप झाले नाही. इमारत ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून आरोग्य खात्याला पत्रव्यवहार केला आहे. इमारत बांधकाम, आॅपरेशन विभाग, स्त्री-पुरुष कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष यासाठी ६९ लाखांची मंजुरी दिली होती. कर्मचारी, अधिकारी यांचे निवासस्थान व विविध महत्त्वाच्या कामांसाठी ५० लाखांची वाढीव मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने आरोग्य खात्याकडे केली आहे, मात्र दोन वर्षांपासून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.आरोग्य सहाय्यक, दोन शिपाई, वाहन चालक तसेच औषध निर्माता, आरोग्य सहाय्यिका अशी अनेक पदे रिक्त आहेत. परिसरातील १४ गावे, तसेच १९ वाड्यांवरील नागरिकांसाठी आरोग्य केंद्र असून, आरोग्य सेवा नाही अशी अवस्था झाली आहे.