सर्व्हिस कॉरिडोरची प्रतीक्षा कायम; नियोजित जागेवर दुकानदारांचा कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:44 AM2019-06-23T03:44:07+5:302019-06-23T03:44:25+5:30
खारघर शहरातील तीन सेक्टरमधून जाणारा सर्व्हिस कॉरिडोरचा रस्ता गायब झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती.
पनवेल - खारघर शहरातील तीन सेक्टरमधून जाणारा सर्व्हिस कॉरिडोरचा रस्ता गायब झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. ‘लोकमत’च्या बातमीनंतर सिडकोने सेक्टर १२ प्राइम मॉल या ठिकाणाहून ग्रामविकास भवन मार्गे इस्कॉन मंदिराकडे जाणारा नियोजित सर्व्हिस कॉरिडोर असल्याचे दुजोरा दिला होता; परंतु या घटनेला आठ महिने झाले तरी परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. या नियोजित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. बेकायदा पार्किंग सुरू आहे. त्यामुळे हा प्रस्तावित सर्व्हिस कॉरिडोर कधी तयार होणार, असा सवाल परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
सिडकोच्या आराखड्यात सुरु वातीपासूनच या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोर नियोजित करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात कोणीही आक्षेप घेतला नसल्याने दुकानदारांनी या ठिकाणी सिमेंटचे भराव टाकून ही जागा गिळंकृत केली. सध्याच्या घडीला याच जागेवर एका दुकानदाराने गाडी विक्र ीचा व्यवसाय थाटला आहे. सुमारे ५० ते ६० गाड्या या जागेवर ठेवून मागील पाच वर्षांपासून हा दुकानदार आपला व्यवसाय करत आहे. या जागेवर काँक्र ीटीकरण करून आपल्या पद्धतीने दुकानदार या जागेचा अनधिकृत वापर करीत आहे. ही बातमी प्रकाशित झाल्यांनतर सिडकोने या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोरच्या उभारणीच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, आठ महिने होऊनही याबाबत दुकानदारांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला दुकानदार बिनदिक्कत या जागेचा वापर करीत आहेत. संबंधित जागेवर सर्व्हिस कॉरिडोर असल्याची माहिती खारघरमधील रहिवासी शैलेश क्षीरसागर यांनी उघडकीस आणली होती.
सर्व्हिस कॉरिडोरचा आराखडा त्यांना माहितीसाठी दिलेला आहे. मात्र संबंधित कामाला नेमकी कधी सुरुवात होईल असा प्रश्न त्यांना पडला आहे. या जागेवर अनधिकृतपणे काँक्र ीटीकरण करून त्याच्यावर आपला व्यवसाय थाटणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. खारघर वाहतूक शाखेचे अधिकारी प्रवीण पांडे यांनीदेखील या ठिकाणी लवकरात लवकर सर्व्हिस कॉरिडोर उभारण्याची मागणी सिडकोकडे केली होती.
लवकरच होणार कार्यवाही
सिडकोचे खारघरमधील अधिकारी ए. टी. अनुसे यांनी यासंदर्भात सर्व्हिस कॉरिडोर उभारणीचा आराखडा तयार केला असल्याचे सांगितले. यानंतर टेंडर काढून या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोरचे काम हाती घेतले जाईल.