तीस वर्षांनी संपली नाट्यरसिकांची प्रतीक्षा
By admin | Published: July 2, 2017 06:18 AM2017-07-02T06:18:18+5:302017-07-02T06:18:18+5:30
५० वर्षांपूर्वी १७ मार्च १९६७ रोजी अलिबागमध्ये ‘श्री सिद्धराज कलामंदिर’ हे खुले नाट्यगृह सुरू झाले होते. तब्बल २० वर्षांच्या सेवेनंतर
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : ५० वर्षांपूर्वी १७ मार्च १९६७ रोजी अलिबागमध्ये ‘श्री सिद्धराज कलामंदिर’ हे खुले नाट्यगृह सुरू झाले होते. तब्बल २० वर्षांच्या सेवेनंतर १९८७मध्ये हे नाट्यगृह बंद पडले. त्यास ३० वर्षांचा काळ लोटला. आता आमदार जयंत पाटील यांच्या कल्पकतेतून पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या माध्यमातून अलिबागमध्ये पुन्हा एकदा नाट्यगृह सुरू होत आहे. सहकार क्षेत्रातील राज्यातील पहिले नाट्यगृह येत्या शुक्रवारी अलिबागकर नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू होत असल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.
भाऊ सिनकर यांनी ‘रंगवैभव’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल ५० वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत १७ मार्च १९६७ रोजी अलिबागमध्ये ‘श्री सिद्धराज कलामंदिर’या खुल्या नाट्यगृहाचा शुभारंभ तत्कालीन कुलाबा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रा. ग. गुप्ते आणि तत्कालीन मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष भालचंद्र तथा अण्णा पेंढारकर यांच्या हस्ते केला. सरदार बिवलकरांनी आपल्या सिद्धराज ट्रस्टची जागा भाऊंना उपलब्ध करून दिल्याने भाऊंनी या खुल्या नाट्यगृहाचे नाव ‘श्री सिद्धराज कलामंदिर’असे ठेवले.
मुंबई-पुण्यातील तत्कालीन सर्व गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून श्री सिद्धराज कलामंदिरच्या रंगमंचावर भालचंद्र पेंढारकर, बाळ कोल्हटकर, राजाराम शिंदे, काशिनाथ घाणेकर,आशा काळे, मधुकर तोरडमल, डॉ. श्रीराम लागू, सतीश दूभाषी, चित्तरंजन कोल्हटकर, बाळ धुरी आदी दिग्गज नाट्य कलाकारांनी आपला अभिनय सादर केला.
अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा नाट्यगृहातील रंगमंचाला अलिबागेतील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नानासाहेब लिमये यांचे नाव देण्यात आले आहे. नऊशे आसन व्यवस्था, जपानची अत्याधुनिक ‘टीओए आॅडीयो सिस्टीम्स’व्यवस्था, उच्च गुणवत्तेच्या आवाजासाठी ‘आॅकॉस्टिकल डिफ्युजर्स’ व्यवस्था, चांगल्या सादरीकरणासाठी पहिला ‘लाइट-वेट’ रंगमंच, केंद्रीभूत वातानुकूलन व्यवस्था, कलाकारांसाठी ‘स्टेट आॅफ द आर्ट ग्रीन रुम्स’, दुर्मीळ डॉक्युमेंटरीजच्या प्रसारणासाठी व्हिडीयो प्रोजेक्शन व्यवस्था, नाटकांच्या तालमींसाठी खुले अॅम्फी थीएटर, ग्रीनलिफ विद्युत प्रणाली, प्रेक्षकांच्या सुविधेकरिता उपाहारगृह, आॅनलाइन तिकीट बुकिंग ही या नूतन नाट्यगृहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे.
रस्ता रुंदीकरणामुळे नाट्यगृह अडचणीत
१९६७ ते १९८७ या २० वर्षांच्या काळात मुंबई-पुण्यातील तत्कालीन सर्व गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून श्री सिद्धराज कलामंदिरच्या रंगमंचावर भालचंद्र पेंढारकर, बाळ कोल्हटकर, राजाराम शिंदे, काशिनाथ घाणेकर, आशा काळे, मधुकर तोरडमल, डॉ. श्रीराम लागू, सतीश दूभाषी, चित्तरंजन कोल्हटकर, बाळ धुरी आदी दिग्गज नाट्य कलाकारांनी आपला अभिनय सादर केला.
१९८७ मध्ये अलिबागमधील रस्ता रुंदीकरणाच्या योजनेत हे सिद्धराज कलामंदिर नाट्यगृह अडचणीत येऊन बंद झाले. मात्र, नाट्यरसिकांच्या इच्छेखातर आमदार जयंत पाटील यांनी पुन्हा नव्याने नाट्यगृह उभारायचा चंग बांधला. शुक्रवार, ७ जुलै रोजी नाट्यगृहाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.