श्रीगाव धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:53 PM2018-11-30T23:53:15+5:302018-11-30T23:53:26+5:30

पाटबंधारे विभागाची निष्क्रियता : २६ वर्षे शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित

Waiting for the water of the Shiggaon dam | श्रीगाव धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

श्रीगाव धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

googlenewsNext

- जयंत धुळप

अलिबाग : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रीगाव येथे १९८५ साली धरण बांधण्यात आले. परिसरातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले होते. शेतीला पाणी देण्यासाठी कालवे आणि पाइपलाइनही टाकण्यात आली; परंतु पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे पाइपलाइनमध्ये पाणी सोडताच ती फुटली आणि प्रत्यक्षात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्या पाइपलाइन दुरुस्तीचा प्रस्तावच आजतागायत झाला नाही. त्यामुळे श्रीगाव धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे समोर आल्यावर आता रायगड पाटबंधारे विभागाला खडबडून जाग आली आहे.


गेल्या २६ वर्षांत पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे पाइपलाइनच्या दुरुस्तीचा विचारच झाला नाही आणि श्रीगाव धरणाच्या लाभक्षेत्रातील श्रीगाव आणि मेढेखार या गावांतील २५० हून अधिक शेतकरी तब्बल २६ वर्षे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. त्यांच्या शेतजमिनी नापीक राहिल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत, श्रीगावचे शेतकरी मनोज पाटील, मेढेखारचे शेतकरी कमलाकर पाटील आदीनी रायगड पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याअंती उघडकीस आले आहे.


श्रीगाव धरणातील पाणी शेतकºयांना मिळाल्यास श्रीगाव, मेढेखार आणि कातळपाडा या गावांतील १०० एकरांपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या शेतीत दुबार पीक घेता येणार असून, भाताबरोबरच भाजीपाला व मत्स्यशेती होऊन शेतकºयांना आर्थिक लाभ होईल. तरी १९९२ मध्ये शेतीच्या पाण्यासाठी टाकलेली; परंतु आजतागायत बंदावस्थेत असलेली पाइपलाइन दुरुस्त करून पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे लेखी पत्र श्रमिक मुक्ती दलाने ३ सप्टेंबर २०१८ रोजी रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता
धनंजय गोडसे यांना दिले आहे. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असेही या वेळी नमूद करण्यात आले आहे.


तब्बल २६ वर्षांनंतर पाटबंधारे विभागास जाग आली. श्रीगाव धरणाच्या पाण्याचा लाभ घेऊ शकणाºया शेतकºयांनी आपणाकडे पाण्याची मागणी अगोदरच नोंदविली आहे. त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार अभियंता एस. एस. पाटील हे धरण परिसरात पाहणीसाठी येणार होते. मात्र, ते आले नाहीत वा या बाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


भातशेती नापीक करण्याचा प्रयत्न
खारलँड विभागाने गेल्या ३० वर्षांत समुद्र सरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केलेली नाही. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेकडो एकर भातशेतीत समुद्राचे खारेपाणी घुसून ती पूर्णपणे नापीक झाली. ही भातशेती नष्ट करून शेतजमीन ओसाड ठरवण्यासाठीचा पहिला प्रयत्न होता.
तर तालुक्यातील शेतकºयांना जे श्रीगाव धरणाचे पाणी शेतीकरिता द्यायचे ते न देता, शेतकºयांच्या जमिनी ओसाड करायच्या हा दुसरा प्रयत्न आहे. शेतजमिनी नापीक झाल्यावर त्यांना ओसाड घोषित करून त्या बड्या भांडवलदार व उद्योगांना कवडीमोल किमतीने शेतकºयांना विकायला लावण्यास भाग पाडणे.
हे गेल्या अनेक वर्षांचे कटकारस्थान आहे. जिल्ह्यातील किती धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्यांच्या हक्काचे शेतीकरिता पाणी मिळाले आहे, याची माहिती जिल्हाधिकाºयांकडे मागणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

Web Title: Waiting for the water of the Shiggaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी