- संजय करडे मुरुड जंजिरा : साळाव-मुरुड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात पडलेले खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. कायम वर्दळीच्या रस्त्यावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले असून, मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.साळाव-मुरु ड रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत विविध सामाजिक व राजकीय संघटना, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्ता दुरु स्ती व डांबरीकरणाबाबत वेळोवेळी अर्ज, विनंत्या व निवेदने देण्यात आली होती. मुरुडमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने डांबरीकरण व खड्डे बुजविले; परंतु सद्यस्थिती साळाव, कोर्लई, बोर्ली, मांडला, बारशिव, काशिद, दांडा, नांदगाव, उसरोली फाटा, मजगाव, मोरा, विहूर तसेच नबाब राजवाडा ते कोटेश्वरी मंदिरापर्यंतच्या रस्त्याची पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी बारीक खडी (रेजगा) आल्याने वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकारही वाढले आहेत.पाऊस थांबल्याने आता रस्त्यावर धूळ, मातीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चालक हैराण होत असून, या रस्त्याच्या कामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.मुरु ड सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता शैलेश शिंदे यांच्याकडे या बाबत विचारणा केली असता, साळाव ते आगरदांडा हा रस्ता मंजूर झाला असून, त्यासाठी सात कोटी रु पये एवढा खर्च अपेक्षित आहे. मात्र, यात रस्त्याची रुं दी वाढवण्यात येणार नसून केवळ मजबुतीकरण करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. कामाचे कंत्राट सवाई कन्स्ट्रक्शनला देण्यात आले असून, लवकरच या कामास सुरु वात होणार आहे. मागील वेळी कोर्लई व बोर्ली येथे जो रस्ता दुरु स्त करण्यात आला आहे. त्यामधून हा भाग वगळण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
साळाव-मुरुड रस्त्याच्या कामाला मुहूर्ताची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:52 PM