वाकण - खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:47 PM2019-08-28T23:47:11+5:302019-08-28T23:47:33+5:30
प्रवासी समाधानी : कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर
पाली : वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे गणपती सणासाठी गावाला येणाºया चाकरमानी प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून एमएसआरडीसीकडून पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
वाकण -पाली -खोपोली महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: दुर्दशा झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट होते, या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाºया वाहनचालक, नोकरदार, प्रवाशांना पाठ, कंबर, मणक्याचे आजार आदी दुखण्याने ग्रासले आहे. या सर्व परिस्थितीकडे एमएसआरडीसीचे वारंवार लक्ष वेधूनही खड्ड्यात हरवलेल्या वाकण-पाली - खोपोली महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नव्हते. अखेर गणपती सणानिमित्ताने एमएसआरडीसीकडून मागील तीन चार दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.
वाकण -पाली -खोपोली महामार्गाचे सर्व खड्डे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी बुजविले जाणार आहेत. या महामार्गावर आजही अवजड वाहनांची सतत वाहतूक व मुसळधार पाऊस यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते; आता खड्डे भरण्यासाठी खडी, दगड, डांबर वापरून बुजविण्यात येत आहेत.
वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्यात येत असल्याने वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाने उघडीप दिल्यास या मार्गावरील सर्व खड्डे डांबर मिक्स खडीने भरून महामार्गावरून गणपतीसाठी कोकणात येणाºया चाकरमानी प्रवाशांसाठी खड्डेमुक्त करण्यात येईल.
- आर.एस. फुले,
व्यवस्थापकीय अभियंता, एमएसआरडीसी