खंडाळामध्ये पाण्यासाठी पायपीट
By admin | Published: October 19, 2015 01:24 AM2015-10-19T01:24:25+5:302015-10-19T01:24:25+5:30
पाणी नियमित येतच नाही आणि आलेले पाणी शुद्ध नसते. त्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आले आहे.... लहान मुलांनासुद्धा याचा त्रास होतो.
कार्लेखिंड : पाणी नियमित येतच नाही आणि आलेले पाणी शुद्ध नसते. त्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आले आहे.... लहान मुलांनासुद्धा याचा त्रास होतो...पिण्यासाठी शुद्ध पाणी आणण्यासाठी आम्हाला एक किलो मीटर असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीच्या नळ स्टॅडपोस्टवर जावे लागते... पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागते, तसेच पाणी सायंकाळच्या दरम्यान येत असल्यामुळे अंधार पडतो... त्यामुळे खंडाळा व नेहुली या गावांमधील महिलांनी रस्त्यावर जाताना जीव मुठीत घेवून जावे लागते... इतर गावांमधील महिला पाणी भरण्यासाठी आल्यामुळे तेथील स्थानिक महिलांना त्रास होतो... परंतु त्यांना येथील पाण्याची समस्या माहित असल्याने त्या हरकत घेत नाहीत...एप्रिल महिन्यापासून तर आमचे पाण्यासाठी खूपच हाल होतात...अशी व्यथा ग्रुप ग्रापमचांयत खंडाळामधील गावामधील महिलांनी मांडली आहे. अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रुप ग्रापमचांयत खंडाळामधील गावामधील नागरिकांना आठ ते दहा दिवसांतून एकवेळच पाणी मिळत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
या ग्रुप ग्रामपंचायतीमधील फक्त खंडाळा नेहुली आणि साईनगर या तीनच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून तीन इंचाच्या पाईपलाईनने साठवणूक पाणी टाकीमध्ये साठविले जाते ते पाणी आळीपाळीने तीन गावांना पुरविले जाते. ते सुद्धा आठ ते दहा दिवसांतून एकदाच ही वस्तुस्थिती असल्याची माहिती उपसरपंच अरुण नाईक यांनी दिली आहे. दोन तीन वर्षापूर्वी पाणी मुबलक असायचे मात्र सध्या वाढत्या लोकसंख्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. तिन्ही गावांतील कुटुंब साधारणत: आठशे इतकी आहेत. त्यामुळे एकावेळी मिळालेल्या पाण्यानंतर पुढले पाणी येईपर्यंत पाण्याचा साठा करावा लागतो. पाणी दर तीन महिन्यांनी तपाासले जाते. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली आहे आणि त्याचे काम सुद्धा चालू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी ही योजना राबविणार आहोत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या मागील जनगणनेनुसार ४ हजार १६४ एवढी असल्याची माहिती नाईक यांनी दिली. पाण्याच्या बाबतीत ग्रा.पं. कडे तक्रार अर्ज सुद्धा दिले जात आहेत. मात्र पाणी प्रश्न सुटत नाही अशी खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)