कर्जतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाक् युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:26 PM2024-03-28T12:26:13+5:302024-03-28T12:26:35+5:30
दोन्ही गटांकडून महायुतीचा धर्म पाळण्याचे पदाधिकाऱ्यांकडून आवाहन
अलिबाग : शिवसेनेच्या (शिंदे गट) पेण येथील मेळाव्यात कर्जतचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना महायुतीच्या नेत्यांमध्ये टीकेचे द्वंद्व सुरू झाले आहे.
दरम्यान, आता दोन्ही गटांकडून महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर विश्वास कोण ठेवणार, असा सवाल उपस्थित केला होता. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
भाई गायकर यांचा पलटवार
सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देऊन शिवसेनेला डिवचले. तुम्ही कडेलोट करणार असाल तर आम्ही हत्तीच्या पायाखाली तुडवू, अशी टीका घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केली आहे. यानंतर शिवसेनेनेही कर्जत येथे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन थेट उत्तर दिले आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनीही घारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. हत्ती कोण हे कोणी ठरवले. आम्ही तुम्हाला मुंगीसारखे समजतो, असा पलटवार गायकर यांनी केला आहे. अशा स्वरूपात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.