रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:11 AM2020-12-04T01:11:50+5:302020-12-04T01:12:50+5:30

आरक्षणामुळे दिग्गजांचे पत्ते कट 

Ward wise reservation of four Nagar Panchayats announced in Raigad district; Self-reliance of all parties | रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा

रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा

Next

तळा : रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. या आरक्षणात ५०% पेक्षा जास्त महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सर्वच नगर पंचायतींमध्ये महिलाराज येणार आहे.

तळामध्ये प्रभाग रचना व महिला आरक्षण आल्याने सत्ताधाऱ्यांमधील अनेक दिग्गजांचे राजकीयदृष्ट्या पत्ते कट झाले आहेत. या न. पं.मध्ये १७ पैकी ९ महिला तर ८ पुरुष अशी आरक्षण सोडत निघाली आहे. असे आरक्षण झाल्याने सर्वच पक्षांवर उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी दाखविण्यात येत आहे.

प्रभाग रचना व आरक्षण पडल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक, आजी-माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे पत्ते कट झाले आहेत. ते आपल्या प्रभागाशेजारी व इतर प्रभागाची उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. या वेळी मागासवर्गीयांना जातीच्या दाखल्यासोबत जात पडताळणीचा दाखला उमेदवारी अर्ज सादर करताना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे चहूबाजूंनी डोकेदुखी वाढली आहे. इच्छुक उमेदवारांची उमेदवारी मिळविण्यासाठी धावाधाव, प्रभाग शोधण्यासाठी पळापळ आणि निवडून येण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांचा अधिक भरणा आहे. त्यातच प्रभागात बदल झाल्याने उमेदवारांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी एक वर्षापासून त्यांच्या प्रभागात निवडणुकीची बांधणी करून वैयक्तिक संपर्क वाढविला होता. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र या आरक्षणामुळे त्यांची स्वप्ने धुळीस मिळालेली आहेत. 

राजकीय वातावरण तापले 
२०१५ मध्ये झालेल्या तळा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र पाच वर्षांनंतरही दैनंदिन स्वच्छता, पाणीपुरवठा समस्या, डम्पिंग ग्राउंडची अवस्था, अर्धवट राहिलेली विकासकामे, गटारे स्वच्छता आदी अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. येत्या काही दिवसांत सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफ डागण्यात येणार असल्याने निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.  तळा नगर पंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Ward wise reservation of four Nagar Panchayats announced in Raigad district; Self-reliance of all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.