पनवेल : पळस्पे गावाभोवती मोठ मोठे गोदामे आणि तसेच गृहप्रकल्पांचे जाळे पसरत आहे. या गोदामांचे सांडपाणी शेतीत घुसल्याने भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे.तसेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला देखील अडथळा निर्माण होत आहे. संबंधित यंत्रणांना वारंवार विनंती करून देखील काहीच उपयोग होत नसल्याने पळस्पे ग्रामस्थांनी दि.21 रोजी आमरण उपोषण आंदोलने छेडले आहे.
याबाबत पनवेल तहसीलदारांना निवेदन सादर करून देखील काहीच कारवाई होत नसल्याने हा आंदोलनाचा पवित्रा पळस्पे ग्रामस्थांनी घेतला आहे.या निवेदनात जेडब्लूसी लॉजिस्टिक पार्क,ओशियन गेट कंपनी,टेक केअर कंपनी आणि अरिहंत बिल्डर्स यांच्या कडून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.या उपोषणाला ग्रामस्थांच्या वतीने दमयंती भगत,शालिनी ठाणगे,सविता घरत,निलेशा भगत,दर्शना बेडेकर,संजय भगत,चंद्रकांत भगत,कमलाकर भगत,नमित बेडेकर आदी ग्रामस्थ पळस्पे हायवे ब्रिज याठिकाणी उपोषणाला बसले आहेत.यावेळी ग्रामस्थांनी अनेक मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.दोन महिन्यापूर्वी पळस्पे ग्रामस्थांनी नैना विरोधात अशाच पद्धतीने बेमुदत उपोषण पुकारले होते.