कर्जत तालुक्यातील वारे-खैरपाडा रस्त्याची दुरवस्था, कर्जत-मुरबाड राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:24 AM2020-01-11T00:24:46+5:302020-01-11T00:24:50+5:30
वारे ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली
संजय गायकवाड
कर्जत : तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून खैरपाडा गावात जाण्यासाठी एकमेव असलेल्या या जोडरस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
कर्जत-मुरबाड महामार्गापासून केवळ ३०० मीटर लांबीचा हा रस्ता आहे. सुमारे २५० ते ३०० लोकसंख्या व ४५ घरांची वस्ती असलेल्या या पाड्याला मुख्यरस्त्याला जोडण्यासाठी १५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांचे काम केले होते. त्या वेळेस केवळ खडीकरण केले गेले. मात्र, त्यावर डांबरी कार्पेट न टाकल्याने काही महिन्यांत या रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खडी उखडली गेली व संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. खैरपाडा गावातील ग्रामस्थ पूर्वी शेताच्या अरुंद बांधावरून आपली रहदारी करत असत. रस्ता तयार झाल्यामुळे वाहनांची ही रहदारी सुरू झाली, गावकऱ्यांचा त्रास कमी झाला; परंतु त्या रस्त्यांची अनेक वर्षात योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील खडी निघाली आहे. यामुळे रस्त्यात खड्डे पडल्याने गावकऱ्यांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील गावकरी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे मागणी करत आहेत.
>आमच्या खैरपाडा रस्त्याचे दोन वेळा खडीकरण करण्यात आले; परंतु त्यावर डांबरी कारपेट टाकले नसल्याने काही दिवसांतच संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले. तेव्हापासून रस्त्याची दुरुस्तीच झाली नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर रहदारी करणे ग्रामस्थांना मुश्कील झाले आहे .
- नितीन शिंदे, ग्रामस्थ
या रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्ता खचल्याने धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी विनंती आहे.
- शरद तवले, ग्रामस्थ