जिल्ह्यात धुवा‘धार’
By Admin | Published: October 3, 2015 02:29 AM2015-10-03T02:29:26+5:302015-10-03T02:29:26+5:30
हस्त नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पाऊस भाताच्या लोंब्या तयार झालेल्या पिकास नुकसानकारक ठरु शकतो असा अंदाज भातशेती
अलिबाग : हस्त नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पाऊस भाताच्या लोंब्या तयार झालेल्या पिकास नुकसानकारक ठरु शकतो असा अंदाज भातशेती आणि पर्जन्यमानाच्या नैसर्गिक गणिताचे अभ्यासक बाळकृष्ण नारायण जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यात १ जून ते २ आॅक्टोबर या काळात सरासरी २ हजार ०२३ मि.मी. पाऊस पडला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४८ मिमी असा सर्वाधिक पाऊस माणगांव येथे झाला आहे. अलिबाग ५ मि.मी., पेण ७.४० मि.मी., मुरु ड १५ मि.मी., पनवेल १ मि.मी., उरण २ मि.मी., कर्जत १६ मि.मी., खालापूर ४२ मि.मी., रोहा ३२ मि.मी., पाली-२०.५० मि.मी., तळा १६ मि.मी., महाड २८ मि.मी., पोलादपूर ३३ मि.मी., म्हसळा २५.६० मि.मी., श्रीवर्धन ३० मि.मी., माथेरान १७ मि.मी. अशी जिल्ह्यात एकूण ३३०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.
----------
दासगांव : गेली महिनाभर पावसाने दडी मारल्याने उभे भातपीक करपते की काय अशी अवस्था निर्माण झाली असताना गेली दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने भातपिकाला जीवदान मिळाले आहे. यामुळे तोंडाचा घास जातो की काय या चिंतेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना सरत्या पावसाने मात्र दिलासा दिला आहे.
राज्यात सर्वत्र दुष्काळी चित्र असतानाच कोकणात देखील पावसाअभावी भातपीक करपून जाते की काय अशी भीती निर्माण झाली असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने ही शेतकरी सुखावला आहे. कोकणात उशिराने सुरू झालेला पाऊस म्हणावा तसा बरसला नाही. यामुळे कोकणातील उंच सखल भौगोलिक स्थितीमुळे जिथे पाणी मिळाले त्या शेतकऱ्यांनी भात लावणी लवकर केली मात्र ज्यांना पाणीच उपलब्ध झाले नाही त्यांची भात लावणी जवळपास महिनाभर उशिराने झाली. शिवाय पाण्याअभावी अनेकांनी भातलावणीच झालीच नाही. अशास्थितीत कोकणात मुसळधार पडणारा पाऊस आॅगस्टमध्येच गायब झाला. भाताची रोपे बहरली असली तरी अद्याप भाताच्या लोंब्या बाहेर पडल्या नाहीत. पुरेसे पाणी आणि पोषक वातावरणाची गरज या लोंब्या बाहेर पडण्याकरिता असते. मात्र सकाळी वातावरणात धुके असल्याने पाऊस गेला की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. पाऊस पडला नाही तर पिकावर विविध रोगांची लागण आणि भाताच्या लोंब्या तयार होणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते.
गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाचे पुनरागमन झाले. सायंकाळी नऊ वाजेपर्यंत हा पाऊस सुरु राहिल्याने शेतामध्ये बऱ्यापैकी पाणी साचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
आहे. (वार्ताहर)
महाडमध्ये मुसळधार
महाडमध्ये शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी २.३० वा. सुरु झालेल्या पावसाची संततधार दोन तास सुरुच होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. तर बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची या पावसामुळे धावपळ उडाल्याचे दिसून आले.
-------------
हस्त नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
१अलिबाग तालुक्यात झालेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने भातपिकास तूर्तास दिलासा मिळाला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. कसाबसा आपल्या शेतीवर खर्च करून जमीन लागवडीखाली आणत भात पीकाची पेरणी केली.
२निसर्गाच्या अनियमितपणाचा फटका शेतकऱ्याला बसतो. गुरूवारच्या पावसाने उथळ भागाच्या म्हणजे डोंगरालगतची शेती आहे. त्या शेतीला पावसाची आवश्यकता होती.तेथील भाताची लोंबी अडकून राहिली होती. जमिनीला भेगा पडल्या होत्या. मात्र जिथे पाण्याचा निचरा आहे. त्या जमिनीत ओलाव्यामुळे भातपीक बऱ्यापैकी आले आहे.
३शेतकऱ्यांचे असे शस्त्र आहे की, हस्त नक्षत्राचा पाऊस झाला तर कणसातील दाणा भरतो व भाताला वजन येते तसेच पडलेल्या पावसामुळे पाण्याला पुरवठा होता. तरीसुद्धा कालच्या पावसामुळे तापलेल्या शेतीला थंडावा मिळाला हे नक्की.