नेरळमधील शहीद मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छतेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:05 PM2020-02-24T23:05:50+5:302020-02-24T23:05:53+5:30
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी
नेरळ : शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. आता शहीद मार्गावरही कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याचे गांभीर्य नेरळ ग्रामपंचायतीला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळचा उल्लेख केला जातो. परंतु नियोजनाअभावी या ठिकाणी विविध समस्यांचा विळखा पडला आहे. घंटागाडी नियमित जात नसल्याने रस्त्यारस्त्यावर कचराकुंड्यांतील प्लास्टीक पिशव्यांसह कचरा बाहेर पडलेला दिसून येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. विशेष म्हणजे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा शहीद योगेश शिवाजीराव पाटील यांच्या नावाने नेरळमध्ये एका रस्त्याला ‘शहीद मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र या फलकाशेजारीच कचºयाचे ढीग साचले आहेत.
एखाद्या मार्गाला संत, हुतात्मा, थोर पुरुषांची नावे दिली तर त्यांचे गांभीर्यदेखील असणे गरजेचे आहे. मात्र नेरळ ग्रापंचायतीला याचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे संत, थोर महापुरुष तसेच हुतात्मा यांचे नाव दिलेल्या रस्त्यांची तरी स्वच्छता करावी, अशी मागणी नेरळमधील नागरिकांकडून केली जात आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याशी यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.
घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्यालगत ठिकठिकाणी साचले कचºयाचे ढीग
दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर